वेग, इतिहास आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत अनुभव!
युरोप टूर म्हणजे फक्त वेगवेगळ्या देशांना भेट देणं नाही, तर प्रत्येक क्षणात नवा अनुभव घेणं असतं. केसरी टुर्सच्या युरोप टूरमध्ये असा एक अनुभव हमखास मिळतो – वेगवान युरोस्टार प्रवास. Guaranteed Eurostar Journey ही केवळ एक व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस नसून आपल्या संपूर्ण टूरला एक प्रीमियम आणि अविस्मरणीय स्पर्श देणारा घटक आहे.
युरोस्टार म्हणजे काय?
Eurostar ही युरोपमधील एक अत्याधुनिक हाय-स्पीड आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा आहे जी इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्स यांना एकमेकांशी जोडते.
१९९४ मध्ये सुरू झालेल्या या सेवेमुळे युरोपमधील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह झाला.
लंडनमधील St Pancras International हे युरोस्टारच्या मागार्तील मुख्य स्टेशन असून येथून पॅरिस (Gare du Nord), ब्रुसेल्स (Midi/Zuid), ॲम्स्टरडॅम आणि इतर शहरांपर्यंत थेट सेवा उपलब्ध आहे.
विमान प्रवासात विमानतळ शहराबाहेर असते, तसेच चेक-इन आणि सुरक्षा तपासणीसाठी जास्त वेळ लागतो, त्याउलट युरोस्टार थेट शहराच्या मध्यभागी पोहोचवते. त्यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्हीची बचत होते. त्यामुळे युरोस्टार हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून स्मार्ट ट्रॅव्हलचा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
२०२३ मध्ये Eurostar Group तयार झाल्यानंतर युरोस्टार नेटवर्क ५ देशांतील २८ शहरांपर्यंत विस्तारले. एकाच तिकिटावर अनेक शहरांचा प्रवास शक्य झाल्याने युरोपमधील प्रवास अधिक सुलभ आणि एकसंध झाला आहे.
चॅनेल टनेल – अभियांत्रिकीचा चमत्कार
युरोस्टारचा सर्वात रोमांचक आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे Channel Tunnel. ५०.५ किमी लांबीचा हा भव्य बोगदा जगातील सर्वात लांब समुद्राखालचा बोगदा म्हणून ओळखला जातो. हा बोगदा इंग्लंडमधील Folkestone आणि फ्रान्समधील Calais यांना समुद्राखालून जोडतो. खरं तर या अद्भुत प्रकल्पाची कल्पना पहिल्यांदा १८०२मध्ये मांडण्यात आली, मात्र तांत्रिक अडचणी आणि राजकीय कारणांमुळे ती अनेक वर्षे प्रत्यक्षात येऊ शकली नाही. अखेर १९८६ मध्ये Treaty of Canterbury नंतर या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळाली आणि १९८८ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ६ मे १९९४ रोजी या बोगद्याचे भव्य उद्घाटन करण्यात आलं.
या बोगद्यातून केलेला सुमारे २० मिनिटांचा प्रवास हा एक विलक्षण अनुभव असतो. बाहेर काहीच दिसत नसतानाही, आपण समुद्राखालून एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत आहोत ही जाणीव मनात एक वेगळाच थरार आणि उत्सुकता निर्माण करते. हा क्षण प्रत्येक पर्यटकांसाठी कायम स्मरणात राहणारा ठरतो.
वेग – ताशी ३०० किमी ⚡
युरोस्टार आपल्या अविश्वसनीय वेगासाठी जगभर प्रसिद्ध आहे. ताशी तब्बल ३०० किमी इतक्या कमाल वेगाने धावणारी ही ट्रेन प्रवासाचा अर्थच बदलून टाकते, तर चॅनेल टनेलमध्येही ती सुमारे १६० किमी/तास वेगाने धावते. लंडन ते पॅरिस हे अंतर फक्त सुमारे २ तास १६ मिनिटांत, तर लंडन ते ब्रुसेल्स केवळ १ तास ५३ मिनिटांत पूर्ण होतं. २००३ साली युरोस्टारने ३३४.७ किमी/तास वेगाचा विक्रम नोंदवून आपल्या तांत्रिक क्षमतेचा ठसा उमटवला. हाय-स्पीड ट्रॅकवरून प्रवास करताना खिडकीबाहेरचं दृश्य क्षणाक्षणाला बदलत राहतं. हा अफाट वेग प्रवासाला केवळ जलदच बनवत नाही, तर प्रत्येक क्षण रोमांचक आणि थरारक अनुभवात रूपांतरित करतो.
सोपा, आलिशान आणि पर्यावरणपूरक प्रवास
युरोस्टारचा प्रवास म्हणजे आराम, लक्झरी आणि सोयींचा परिपूर्ण मिलाफ. पर्यटकांच्या विविध गरजांचा विचार करून स्टँडर्ड, स्टँडर्ड प्रीमियर आणि बिझनेस प्रीमियर असे तीन वेगवेगळे प्रवासवर्ग उपलब्ध आहेत. प्रत्येकाला आपल्या बजेटनुसार आणि पसंतीनुसार पर्याय निवडता येतो. आसनव्यवस्था अत्यंत आरामदायी असून पुरेशी लेगरूम, स्वच्छ आणि शांत वातावरण यामुळे प्रवास अधिक सुखद बनतो. मोफत Wi-Fi सुविधेमुळे प्रवासादरम्यान काम, मनोरंजन किंवा संपर्क सहज ठेवता येतो, तर कॅफे-बारमध्ये उपलब्ध असलेले स्नॅक्स आणि पेय प्रवासाला आणखी आनंददायी बनवतात. सामान ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वतंत्र जागा असल्यामुळे पर्यटक निश्चिंतपणे प्रवास करू शकतात. याशिवाय, विमानप्रवासाच्या तुलनेत युरोस्टारमध्ये बोर्डिंग प्रक्रिया खूपच सोपी आणि कमी वेळखाऊ आहे. स्टेशन शहराच्या मध्यभागी असल्यामुळे विमानतळापर्यंतच्या अतिरिक्त प्रवासाचा वेळ वाचतो, आणि त्यामुळे संपूर्ण प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरतो. शिवाय विमानाच्या तुलनेत यामध्ये सुमारे ९०% कमी कार्बन उत्सर्जन होते, त्यामुळे युरोस्टार हा पर्यावरणपूरक प्रवासाचा उत्कृष्ट पर्याय ठरतो.
लंडन ते पॅरिस युरोस्टार
केसरी टूर्सच्या युरोप टूर्समध्ये आपण लंडन ते पॅरिस हा प्रवास युरोस्टारने करतो. प्रवासाची सुरुवात St Pancras International येथून होते. ट्रेन सुटल्यावर शहर मागे पडतं आणि Kent मधील हिरवागार निसर्ग दिसू लागतो. नंतर ट्रेन चॅनल टनेलमध्ये जाते. सुमारे २० मिनिटे आपण समुद्राखालून प्रवास करतो.
फ्रान्समध्ये बाहेर आल्यावर शेती, लहान गावं आणि पवनचक्क्या दिसतात. ट्रेन ३०० किमी/तास वेगाने धावत असते. त्यामुळे सगळं दृश्य जणू चित्रपटासारखं वाटतं.थोड्याच वेळात आपण पॅरिसच्या मध्यभागी पोहोचतो. नयनरम्य निसर्ग, वेग आणि निव्वळ आनंद यांचा सुंदर संगम असलेला म्हणजे एक अविस्मरणीय अनुभवच!
