द ग्रेट मायग्रेशन!

द ग्रेट मायग्रेशन… आफ्रिकेतील वन्यजीवांचा हा अद्भुत प्रवास प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच कळतं की, त्याला ‘ग्रेट’ का म्हटलं जातं. वन्यजीवांचं नेतृत्व, सहकार्य, वात्सल्य आणि निसर्गाची अद्भुत शिस्त यांची ही जिवंत कहाणी आहे.

अन्न आणि पाण्याच्या शोधात हजारो प्राणी केनिया आणि टांझानिया प्रदेशातून एकाच दिशेने प्रवास करतात. यातील अनुभवी प्राणी जणू कुटुंबप्रमुखाप्रमाणे नेतृत्वाची भूमिका निभावतात. त्यांच्या मागोमाग संपूर्ण कळप विश्वासाने पुढे जातो. पिल्लांना सुरक्षित ठेवणं, धोक्याची चाहूल लागताच सर्वांना सावध करणं… ही त्यांची जबाबदारीच असते.

मायग्रेशनच्या काळात सिंह, बिबट्या, हत्ती, गेंडा आणि आफ्रिकन म्हैस हे ‘बिग फाईव्ह’ प्राणी पाहण्याची संधी मिळते. या स्थलांतरादरम्यान कधी, कुठे आणि काय पाहायला मिळेल? याचा फक्त अंदाजच बांधता येतो.

माझ्या गेल्या वर्षीच्या टूरमध्येही असंच काहीसं झालं.

आम्ही सफारीसाठी निघालो होतो. काही अंतर गेल्यानंतर आमची जीप थांबली. जीपसमोर एक हत्ती बराच वेळ उभा होता. त्याची शेपटी हलत होती, कानांची हालचाल सुरू होती आणि तो सतत आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेत होता.

काही मिनिटांनंतर आमच्या डाव्या बाजूच्या झुडपांतून आणखी एक हत्ती बाहेर आला. मग एकामागून एक लहान-मोठे मिळून जवळपास चाळीसहून अधिक हत्ती रस्ता ओलांडू लागले. कुठेही गोंधळ नव्हता, घाई नव्हती… फक्त विश्वास होता. त्या क्षणी मी आमच्या ग्रुपकडे पाहिलं. अनेकांनी कॅमेरे खाली ठेवले होते. सगळे जण फक्त तो क्षण जगत होते.

हा स्थलांतराचा प्रवास अनुभवण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. निसर्गाचा हा अद्भुत सोहळा मनमुराद अनुभवता यावा यासाठी आम्ही टूरचं अभ्यासपूर्ण नियोजन केलं आहे. हॉटेल्स, गाड्या, सफारीच्या वेळा अशा प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. सफारीसाठी लँड क्रूझर असून प्रत्येक गाडीत सहा जण असतात. त्यामुळे प्रत्येकाला उत्तम दृश्यांचा आनंद घेता येतो आणि अधिक आरामदायी अनुभव मिळतो.

हॉटेल्स आणि लॉजेसमधील मुक्काम टूरचा अनुभव अधिक खास बनवतात. प्रत्येक हॉटेलमधून दिसणारा नजारा आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातो. केनियातील मसाई मारामधील मारा सिम्बा लॉज हे त्यापैकीच एक आहे. जवळ नदी असल्यामुळे पाणी पिण्यासाठी आलेले प्राणीही पाहायला मिळतात. सकाळी चहा किंवा कॉफीचा आस्वाद घेताना दूरवरून एखाद्या प्राण्याचा आवाज ऐकू येतो आणि क्षणभर वाटतं, जणू तो आपल्याला ‘गुड मॉर्निंग’ म्हणत आहे. सांबूरू, लेक नाकुरू आणि नैरोबीमधील फाइव्ह-स्टार हॉटेल… अशा उत्कृष्ट प्रॉपर्टीज आपापल्या पद्धतीने वेगळा अनुभव देतात. स्विमिंग पूल, कॅफे, जिम, गिफ्ट शॉप आणि मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट्स अशा अनेक सुविधा इथल्या मुक्कामाचा अनुभव अधिक लक्झरियस बनवतात.

मंडळी, द ग्रेट मायग्रेशन ही निसर्गाची एक अद्भुत प्रक्रिया आहे. इथे नेमकं काय पाहायला मिळेल, कोणता प्राणी कुठे दिसेल किंवा पुढच्या क्षणी काय घडेल? याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो. पण एक गोष्ट नक्की… जे काही पाहायला मिळेल, ते आयुष्यभर लक्षात राहील.

Tags