साऊथ कोरिया

सध्याच्या काळात कानाशी किंवा हातात मोबाईल नसलेली व्यक्ती दिसणं मुश्किल आहे. जो तो मोबाईलमध्ये मग्न असतो. वर्तमानपत्रात, टिव्हीवर अनेक जाहिराती सतत दृष्टीस पडतात. त्यातील एक अग्रगण्य नाव आहे सॅमसंग. मोबाईल खेरीज त्यांची इतरही अनेक दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स उपलब्ध आहेत. सॅमसंगच्याच बरोबरीने एलजी हा पण सुप्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. आपल्या रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये ह्युंदाई आणि कियाची संख्या लक्षणीय आहे. हे सर्व साऊथ कोरियन ब्रॅण्ड्स आहेत. शिवाय सध्याच्या युवा पिढीत साऊथ कोरियन पदार्थ, के पॉप, बीटीएस, ब्लॅक पिंकसारखे म्युझिक बँड्स आणि टिव्ही व ओटीटी सिरीज आणि कॉस्मेटिक्स किंवा ब्युटी प्रोडक्ट्स खूपच पॉप्युलर आहेत. त्यामुळे साऊथ कोरियाबद्दल फार कुतूहल वाटत होते. सगळे जुळुन आले आणि आम्ही नुकतीच साऊथ कोरियाला भेट दिली.

एका बाजूला नॉर्थ कोरिया, दुसऱ्या बाजूला चीन हा धोकादायक देश आणि आता काही प्रमाणात मित्र राष्ट्र झालेला जपान यांच्यातील हा शिस्तबद्ध देश आहे. भूतकाळात जपानने आक्रमण करून अनेक वेळा त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, तसेच स्वःताच्या स्वार्थासाठी रशिया आणि अमेरिकेने कोरियाचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे तुकडे केले. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर नावारूपाला आलेला हा देश जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून आहे. दक्षिण कोरिया जपानच्या ताब्यातून स्वतंत्र झाला तो दिवस आहे 15 ऑगस्ट (योगायोग ). त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात जपान आणि अमेरिका या देशांबद्दल फार राग साठला आहे हे जाणवते. तरीही सध्याच्या सरकारने जपानशी जाणीवपूर्वक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला आहे, जो काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया पासपोर्ट धारकांना उत्तर कोरियात जाण्यास मनाई आहे. या लोकांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. कुठेही कणभरही कचरा दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटी शोधावी लागते. कचरा न चुकता वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्यांमध्ये टाकला जातो. सगळीकडे स्वच्छता, टापटीप, शिस्तबद्धता आढळते. जागोजागी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला, डिजिटल व्यवहार असलेला, औषधालाही भिकारी नसलेला, झिरो क्राईम रेट असणारा आणि रात्री अपरात्री देखील महिलांसह सर्वांना अतिशय सुरक्षित असा हा आगळा वेगळा देश प्रत्येकाने पहावा, अनुभवावा म्हणून हा लेखनप्रपंच.

Seoul, सोल किंवा सेऊल (असं आम्ही शाळेत असताना शिकलो होतो ) ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे हे आपल्याला माहित आहेच. ऐसपैस गुळगुळीत रस्ते आणि सुळकन जाणाऱ्या गाड्या, ज्यात किया आणि ह्युंदाईच्याच जास्त होत्या. आपल्या इथे न दिसणाऱ्या हाय एन्डच्या खूप गाड्या पहायला मिळाल्या. पण पायी चालणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य होती. क्वचितच माणसांची वर्दळ होती. गगनचुंबी इमारती पाहून मला तरी दुबई किंवा अबु धाबीची आठवण झाली. गंमत म्हणजे इथल्या रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्समध्ये बिल्डिंग्जवर 101, 102… असे ठसठशीत क्रमांक होते पण नावं मात्र दिसली नाहीत, फक्त एकाच बिल्डिंगवर उंचावर एकच उल्लेख केलेला आढळतो. आपल्या इथे आपण किती छान नावं देतो तसं नाही. शिवाय सर्वसाधारणपणे सगळ्या बिल्डिंग्ज सारख्याच वाटतात. Seoul मधून हान नदी वाहते. नदीच्या अलिकडे व पलिकडे जाण्यासाठी शहरात 31 ब्रिजेस आहेत. त्यातील एक दोन मजली आहे ज्यावर वन वे म्हणजे एकेरी वाहतूक केली जाते. वरच्या पूलावरून जाताना नदी व आजुबाजुचा परिसर फारच छान दिसतो.

सर्व साधारणपणे आपापसातील इर्षा वा द्वेष, मत्सर यामुळे एक भाऊ दुसऱ्याची हत्या करून स्वतः गादीवर बसतो तोच प्रकार इथे सुद्धा घडून गेला आहे. त्यामुळे जुन्या काळातील एकूण पाच वेगवेगळे राजवाडे येथे आहेत, त्यापैकी कोणत्याही वास्तुमध्ये सध्या कोणीही वास्तव्य करत नाही कारण आता राजा किंवा राजेशाही अस्तित्वात नाही. परंतु संपूर्ण परिसर आणि प्रत्यक्ष राजवाडा सुंदर आहे. आम्ही दोन राजवाडे बघितले. सगळ्या राजवाड्यांची स्थापत्य शैली अथवा वास्तू शैली साधारण सारखीच आहे. ईस्ट गेट, वेस्ट गेट आणि साऊथ गेट अशी तीन प्रवेशद्वारे असतात. त्यापैकी ईस्ट व साऊथ गेट शुभ तर वेस्ट गेट अशुभ मानले जाते आणि म्हणूनच कुटुंबातील व्यक्तींचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी या दारातून घराबाहेर नेला जातो. नॉर्थ गेट सर्वात अशुभ मानले जाते कारण त्या दिशेने नकारात्मक उर्जा प्रवेश करते असे म्हणतात. त्यामुळे कुठल्याही वास्तुला उत्तरेला दार वा खिडक्या नसतात. अंधश्रद्धेचा पगडा आहे. मागच्या बाजूला पर्वतराजी व समोरच्या बाजूला नदी अथवा जलाशय असणे फारच उत्तम समजले जाते. सर्वात मोठ्या राजवाड्याच्या आवारात बसविण्यात आलेली फरशी मुद्दाम खडबडीत होती. कारण या फरशीवर सूर्य प्रकाश परावर्तित होऊन राजाच्या डोळ्यांना त्रास होणार नाही हे एक आणि दुसरे म्हणजे भेटायला येणारी मंडळी आपोआपच मान खाली घालून यायची. या ठिकाणी खूप तरूण तरूणी पारंपरिक वेशभूषा करून आलेली दिसत होती कारण मग त्यांना प्रवेश फी माफ केली जाते. काही खूप छान दिसत होते पण बरेचसे जरा गबाळेच वाटले. विशेषतः मुली, कारण जरतारी पायघोळ घेरदार झगा आणि त्यावरचा लांब बाह्यांचा ब्लाऊज तरंगत असल्यासारखा. बाकी उत्तम ड्रेसिंग सेंस असलेल्या तरूणी या वेषात जरा विनोदीच वाटत होत्या.

येथील नॅशनल फॉकलोर कल्चरल म्युझियममध्ये जुन्या काळातील विविध प्रकारच्या गोष्टी सुबकपणे मांडल्या आहेत. ज्यामुळे तिथल्या संस्कृती बद्दल माहिती मिळते.

DMZ म्हणजे डीमिलिटराईज्ड झोन अर्थात दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यामधील नो मॅन्स लँड. तिथे एक युनिफिकेशन ब्रिज ऑफ नॉर्थ कोरिया अँड साऊथ कोरिया आहे, ज्याच्या दोन्हीही टोकांना व्यवस्थित कुंपण घालून बंदिस्त करून ठेवले आहे. देशाचे दोन तुकडे झाले तेव्हा अनेक कुटुंबांतील आप्तस्वकीयांची ताटातूट झाली. अनेकांना आपल्या नातलगांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे वर्षातील एका विशिष्ट दिवशी विशिष्ट जागी या दोन्हीही देशातील इच्छुक व्यक्ती येऊ शकतात आणि आपली दुरावलेली कोणी व्यक्ती भेटते का? ते पाहतात. हे ऐकून खूपच वाईट वाटले. तिथल्या डोरा ऑब्झर्व्हेटरीला जाण्यासाठी आपल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेवून तिथल्या बसेस घ्याव्या लागतात. या उंचावरील ठिकाणी खास दुर्बीणी बसवल्या आहेत, त्यातून आपल्याला दोन्हीही देशांमधील बॉर्डर दिसते. या बाजूला दक्षिण कोरियाचा तर सुमारे चार किमी अंतरावर उत्तर कोरियाचा राष्ट्रध्वज फडफडत होता. बाकी सर्वत्र शांतता पसरली होती. स्वच्छ हवा असल्यास नुसत्या डोळ्यांनी पण पाहू शकतो, मात्र दुर्बीणीमधून दृश्य अधिक सुस्पष्ट दिसते. (भारत पाकिस्तान मधील वाघा बॉर्डरचा अनुभव केंव्हाही रोमांचकारी आहे.) तिथेच एका डॉक्युमेंटरीद्वारे जपानने केलेले आक्रमण व नागरिकांना सोसावे लागलेले अत्याचार, रशिया व चीनची दंडेलशाही आणि यामधून स्वतंत्र झालेला सक्षम दक्षिण कोरिया आपण पहातो. त्याठिकाणी टनेल नंबर १, २, ३ अशी वेगवेगळी पाच भुयारे आहेत. पर्यटकांना टनेल नंबर ३ या साधारण साडेसातशे मीटर लांब भुयारातून टोकाला जाऊन एका झरोक्यातून पलिकडे असणाऱ्या तशाच झरोक्यातून दिसणारी उत्तर कोरियाची सीमा पहाता येते. या भुयारातून उत्तर कोरियामधून दहा हजार सैनिक दक्षिण कोरियात घुसले होते. अशीच अजूनही काही भुयारे असण्याची शक्यता वर्तवली जाते. अरूंद आणि कमी उंचीच्या या भुयारातून डोक्यावर जड हेल्मेट ऊर्फ शिरस्त्राण (कंपल्सरी आहे, कारण भुयार दगडी असल्याने वाकून जातानाही डोकं आपटून गंभीर इजा होऊ शकते) चढवून कुतुहलाने आम्ही गेलो खरं पण निर्मनुष्य जमीनीखेरीज काही सुद्धा दिसत नाही. अंतर कमी असूनही उलट ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे थोडे दमायलाच झाले. पण “आम्ही गेलो होतो” असं सांगून इतरांवर छाप पाडली ना!

त्याखेरीज आकर्षण होते ते लॉटो वर्ल्ड टॉवरला जाऊन या 123 मजली इमारतीच्या 118 व्या मजल्यावर असलेल्या क्लिअर ग्लास फ्लोअरिंगवर जाणे. त्यातून खाली दिसणारी चौकातील वाहतूक पहायला मजा आली. गाड्या खेळण्यातल्या वाटत होत्या. शिवाय 122 व्या मजल्यावरून संपूर्ण शहर दिसत होते. तिथे एका स्क्रीनवर बटण दाबून विविध देशांच्या झेंडयांचे चित्र निवडता येत होते. मग आपापल्या राष्ट्रध्वजाशेजारी उभं राहून I am from… म्हणत स्वःताचा फोटो काढणे अपरिहार्य नाही का? वय वाढले तरीही अशा गोष्टी करायला फार गंमत वाटतेच की नाही. येथील लिफ्टच्या स्पीडची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे असे कळले.

हाय स्पीड बुलेट ट्रेनने सोल हून बुसान (Busan)ला (320km) अवघ्या सव्वा दोन तासात गेलो. वाटेत सात स्टेशनवर ट्रेन थांबली पण कुठेही गडबड गोंधळ नाही. सगळीकडे तुरळक माणसे, आपल्या मुंबईत मध्यरात्री पण स्टेशनवर गर्दी असते, इथे दिवसा ढवळ्या पण शुकशुकाट होता. केवळ चार सहा जणांची चढ-उतार बघितली. आवाज फक्त अनाऊन्समेंटचाच. (हां, आता आमची ‘वंदे भारत’ पण अशीच झकास आहे हं. गाडी स्टेशनात शिरताना पहाच एकदा, कसा अभिमान वाटतो आपलाच आपल्याला.) राजधानी सोल असली तरी बुसान हे खूप महत्त्वाचे शहर आहे. बरीचशी सरकारी कार्यालये, बँकांची हेड ऑफिसेस आणि अनेक प्रमुख उद्योगधंदे शहरात व परिसरात आहेत. त्यामुळे येथे थोड्या तरी इंग्रजी पाट्या दिसल्या, नाहीतर इतरत्र फक्त कोरियन खेरीज काही नाही. बुसान हे पूर्वेकडील जपान, चीन व पश्चिमेकडील युरोपीय देश यांच्यातील मध्यवर्ती बंदर आहे. त्यामुळेच अतिशय महत्त्वाचे आहे. खूप कार्गो शिप्स येथून रवाना होतात. Haeundae beach वर Haedong Yonggungsa हे कोरियातील सर्वात मोठे व समुद्र किनारी असलेले एकमेव बुद्ध मंदिर आहे. एका बाजूला उसळणारा समुद्र व छोट्या टेकडीवरील बुद्ध मंदिर पाहून काहिशी मुंबईतील महालक्ष्मी मंदिराची आठवण झाली. तेही असेच उंचावर आहे आणि एका बाजूला समुद्र आहे. 15 मे रोजी कोरियात बुद्ध जयंती साजरी होते, त्यामुळे सगळा परिसर पेपर लँटर्न्स आणि खरी खोटी पानं, फुलं व इतर गोष्टी वापरून सुंदर सजवला होता. बरेच श्रद्धाळू एका छोट्याश्या घुमटीतील बुद्ध मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करून नमस्कार करत होते. त्याकरिता लागणारे पाणी आणि लांब दांडा असलेली लाकडी पळी (?) उजव्या हाताला ठेवलेली होती. आम्हीही तसेच केले. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी तास दिड तास रिव्हर क्रूझवर निवांतपणे इकडे तिकडे बघत आराम झाला. सूर्यास्त अनुभवता आला. नदीच्या पाण्यात काठावरील गगनचुंबी इमारतींचे प्रतिबिंब आणि मागे अस्ताला जाणारा सूर्य खूप छान दिसत होते.

Gamcheon Cultural Village ही खरं तर टेकडी उतारावरील स्लम किंवा साध्या झोपडीवजा घरांची वस्ती होती, कारण ते सगळे उत्तर कोरिया मधून आलेले निर्वासित होते. कफल्लक असल्यामुळे गावाबाहेर उजाड जमीनीवर चोरून आणलेल्या साहित्यातून त्यांनी कशीबशी घरं बांधली होती. तरूण मंडळी कामासाठी बाहेर पडली की घरात बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उरत. क्वचित कोणी कामांसाठी दूर निघून गेले. त्यामुळे चोरीमारीचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले. म्हातारी मंडळी घाबरून गेली. अचानक कोणा एका (नाव सांगितले होते पण लक्षात ठेवणं कठीण आहे) अधिकाऱ्याला कल्पना सुचली. त्याने शहरातील कलाकारांना प्रोत्साहन दिले आणि घरांच्या भिंतींवर व इतरत्र त्यांच्या मनाला वाटेल तशी चित्रे काढायला सांगितले. त्यामुळे भकास गावाचे रंगरूप बदलून गेले. थोडीफार प्रसिद्धी मिळाली, पर्यटक यायला लागले. दुकांनांची संख्या वाढली. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. वर्दळ वाढल्याने सुरक्षितताही वाढली. चढ उतार व वळणदार असणारे रस्ते असणारे हे गाव तसं छान दिसतं पण त्याला माचू पिचू ऑफ साऊथ कोरिया का म्हणतात ते मात्र समजलं नाही. आम्हाला तरी दोन्ही मध्ये काही साम्य वाटले नाही.

Bulguksa temple – Bul म्हणजे बुद्ध आणि guk म्हणजे ठिकाण. हे मंदिर 774 मध्ये बांधलेले असून जपानमधील क्योटो टेम्पल हे याचीच प्रतिकृती आहे. इथेही रंगीबेरंगी कागदी पताका लावून सुंदर सजावट केली होती आणि सुरू पण होती. दुसऱ्या दिवशी बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रम असल्याने मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते परंतु बाजूला असलेल्या छोट्या चढणीच्या रस्त्याने जायला परवानगी होती. आतील बाजूस दोन दीपमाळा असाव्यात तसे दोन मनोरे होते. आवार प्रशस्त होते.

Seokguram Grotto – Seokguram म्हणजे stone आणि grotto म्हणजे गुंफा. Buddha statue in the stone dome अर्थात दगडी घुमटाकाराखाली असलेली बुद्ध मूर्ती. मुख्य मंदिरात जाण्यासाठी वीस-एक व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या चढून गेले की समोर खूप छान निसर्ग सौंदर्य दिसते. परंतु तिथून पुढे पुन्हा शंभरहून अधिक पायऱ्या, ज्या कमी अधिक उंचीच्या आणि खडबडीत आहेत, चढून वर गेले की बुद्ध मूर्ती आहे कारण दगडी घुमट डोंगरावर बसवला आहे. समुद्राकडे तोंड असलेली ही बुद्ध मूर्ती भूमीस्पर्श मुद्रेमध्ये आहे. अशा प्रकारची ही जगातील एकमेव मूर्ती आहे, असे म्हणतात. म्हणूनच हे स्थान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. याला कोरियन नॅशनल ट्रेझर म्हटले जाते.

दक्षिण कोरिया मधील जेजू आयलँड व त्या अंतर्गत जेजू शहर फारच सुंदर आहे. तिथे जायला अर्थातच फ्लाईट शिवाय दुसरा सोपा मार्ग नाही. विमानतळावरून बाहेर पडलो तर थंडगार बोचरे वारे वाहत होते. आणि पावसाची भुरभुर सुरू होती. अक्षरशः हुडहुडी भरली सगळ्यांना. तरी आमच्या स्थानिक गाईडने पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे गरम कपडे हाताशी ठेवले होते म्हणून बरं झालं. आपल्या मरीन ड्राईव्ह सारख्याच समुद्र किनारी गेलो होतो. मात्र किनारा सगळा काळाभोर खडकाळ आहे. त्यामुळे अर्थातच संरक्षक भिंत बांधलेली आहे. एका विशिष्ट ठिकाणाहून हा किनारा ड्रॅगन सारखा दिसतो. इच्छा असूनही पाऊस व थंडीमुळे तिथे जास्त वेळ घालवणे शक्य झाले नाही. समोरच एअरपोर्ट होता. हे आयलँड इतके प्रसिद्ध आहे की दर पाच मिनिटांनी एक विमान उतरताना दिसत होते. अनेक देशांतून पर्यटक येत असतात.

या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली जमीन ज्वालामुखी मधून बाहेर पडलेला लाव्हारस थंड होऊन तयार झालेल्या खडकांची बनली आहे. त्यामुळे सर्वत्र काळसर सच्छिद्र खडक आहे. पावसाचे पाणी बघताबघता झिरपून जाते. जमीनीत अजिबात मुरत नाही. म्हणून नैसर्गिक झरे नाहीत आणि त्यामुळे पाण्याची टंचाई असते. पूर्वी तर फारच दुर्भिक्ष होते. परंतु आता मात्र तंत्रज्ञान वापरून काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. गंमत म्हणजे काही भागात मात्र हिरवीगार वनश्री आणि सुंदर धबधबे सुद्धा आढळतात. हे एक प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन पण आहे.

पूर्वी येथे वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य फार खडतर होते. काहीच रोजगार उपलब्ध नव्हता. पुरुष मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात आणि बरेचदा खराब वादळी हवामानामुळे मृत्यू पावत. त्यामुळे गावात फक्त बायका उरत. मग पैसे कमावण्यासाठी कष्ट करणे आलेच. Rocks, Wind and Women या तीन गोष्टींसाठी जेजू आयलँड प्रसिद्ध आहे, असे गमतीने म्हटले जाते. पुरुष संख्या कमी असल्याने बायका त्यांना लाडावून ठेवतात, त्यामुळे सगळे एकजात आळशी असतात असं गाईड म्हणाली. पण ते भूतकाळात. आता रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळे परिस्थिती बदलली आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही SEONGEUP या भूतकाळात अस्तित्वात असलेल्या छोट्याश्या गावात फेरफटका मारायला गेलो होतो. प्रवेशद्वाराशी Dolhareubang – stone grandpa’s statue उर्फ म्हातारबाबांची दगडी मूर्ती होती. बऱ्याच ठिकाणी ती पाहिली होती. ‘आपले रक्षण करणारे आजोबा’ अशी काहीशी पूर्वीच्या लोकांची कल्पना होती. Dolhareumang म्हणजे grandma उर्फ आजी. पण ती मात्र एकाच ठिकाणी पाहिली. जुन्या काळातील, गवतापासून उतरते छत बनवलेली दगडा मातीची घरे मुद्दाम जतन केलेली असून काही घरांमध्ये थोड्याफार आवश्यक सुधारणा करून आजही लोक रहातात. घराच्या फाटकाला जर एकच बांबू लावला असेल तर तो किंवा ती पाच-दहा मिनिटांत परत येणार आहे, दोन बांबू असतील तर एकदम संध्याकाळी येईन आणि तीन असतील तर बाहेरगावी गेलो आहोत. परंतु एकही बांबू नसेल तर ‘या, आम्ही घरी आहोत’ अशी सांकेतिक भाषा तेव्हा वापरली जात असे. त्यामुळे अचानक पाऊस आला आणि अंगणात कपडे किंवा काही वाळवण असेल तर शेजारी आपणहून ते उचलून घरात नेऊन ठेवत असत. कारण प्रत्यक्ष घराला कडी कोयंडा नसेच, हे ऐकून मजा वाटली.

त्यानंतर Seongsan Ilchulbong म्हणजे सनराईज पीक पहायला गेलो. हायड्रो वोल्कॅनिक इरप्शनमुळे नैसर्गिकरित्या तयार झालेले हे उंच क्लिफ आहे. संपूर्ण चढ असणाऱ्या या क्लिफच्या सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी स्टीप पायऱ्या आहेत पण ऊन असतानाही थंड भणाण वारा असल्यामुळे आणि स्वतःचे वय लक्षात घेऊन आम्ही काही ते धाडस केले नाही. तरीही साधारण निम्म्यापेक्षा कमी उंचीवर असलेल्या दुसऱ्या point पर्यंत जाऊन निसर्ग सौंदर्य पाहिले. या ठिकाणी खास उल्लेख करावा अशी गोष्ट समजली होती व योगायोगाने पहायला मिळाली. इथे पूर्वी पासून फक्त वूमेन डायव्हर्स आहेत. त्या सलग दहा बारा मिनिटे श्वास रोखून पाण्याखाली राहून Abalone मासे पकडतात व असं कितीतरी वेळा पाण्यात जाऊन येतात. पकडलेले ताजे मासे खरेदी करायला लोक तयारच असतात. आजही सत्तरीच्या पुढे वय असलेल्या महिला हे काम करतात. कारण आताशा हे काम करायला तरूणी तयार नसतात. आम्ही अशा चार जणींना प्रत्यक्षात डायव्ह मारताना पाहिले. बघताबघता माशांसारख्या सुळकन पाण्यात शिरल्या. त्यांच्या कौशल्याची अगदी कमाल वाटली.

शेवटच्या दिवशी महत्वाचा कार्यक्रम पार पाडला तो म्हणजे खरेदीचा. अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स इथे उपलब्ध आहेत, परंतु ती खरेदी करणे टाळावे कारण त्यांची वर्ल्ड वाईड वॉरंटी मिळालीच तर ते महागात पडते आणि शिवाय बिघडले तर भारतात दुरुस्ती करून घेणे कठीण जाते. त्यापेक्षा रेडिमेड कपडे आणि कॉस्मेटिक्सची खरेदी करणे ठीक पण त्यासाठी इंग्रजी समजणारी व्यक्ती भेटायला हवी. इतक्या तऱ्हेची फेस क्रीम, फेशिअल मास्क, लिप्सस्टिक, लिप बाम, परफ्युम व अजूनही अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत पण त्यावरील मजकूर कोरियन भाषेत, समजायचे कसे? शिवाय किंमत कळली तरी बिल चुकते करायचे कसे? कोरियन चलन वॉनमध्ये की युएस डॉलर्समध्ये की सरळ कार्ड पेमेंट? हा बिकट प्रश्न. अर्थात आम्हाला इंग्रजी समजेल अशा मुली असलेल्या दुकानात नेले होते तरीही थोडी झटापट करावी लागतच होती. मोठ्या दुकानात कार्ड पेमेंट स्विकारले जाते पण छोट्या लोकल मार्केटमध्ये एकतर वॉनच घेतात किंवा कसेबसे युएस डॉलर्स घ्यायला तयार होतात. त्यातही वॉन टू डॉलर्स कन्व्हर्ट करण्यात, तेसुद्धा कॅल्क्युलेटरवर बरं का, वेळ जातो. बार्गेनिंग करणारे दुकान असेल तर हुज्जत घालत बसावे लागते. परंतु खरेदीचा आनंद मात्र कोणीही सोडला नाही.

सगळीकडे केवळ कोरियन भाषाच वापरली जाते. अगदी हॉटेलच्या रूम मधील टिव्ही व एसी च्या रिमोट वरील बटणे वापरणं कठीण होते. त्याहीपेक्षा अधिक त्रास बाथरूममध्ये होता कारण शॉवरलाच नाही तर कमोड सीटलाही सीट गरम करण्यासाठी कंट्रोल पॅनल होते पण सीट किती गरम आहे? कमी जास्त करावे तरी कसे ? हे उलगडणे अशक्य होते. बुडाला चटका बसला तर काय घ्या, पंचाईतच की. त्यापेक्षा हात लावून अंदाज घेत आहे तसेच वापरणे श्रेयस्कर होते.

एकमेकांना हा अनुभव सांगताना फार मजा आली. आमच्या सारख्या एक दोन चाणाक्ष (?) लोकांनी ट्रान्स्लेटर ऍप डाऊनलोड करून घेतला होता खरा पण ते शब्द काही सेकंदच टिकतात. शिवाय व्हॉईस ट्रान्सलेशन करायला जावे तर स्पेलिंग वाचून, पाहून उच्चार करणे कर्मकठीण. इंग्रजीवाचून या लोकांचे कणमात्र अडत नाही पण येणाऱ्या पर्यटकांची किती तारांबळ उडते याची जराही जाणीव नसावी? शेजारी एखादा इंग्रजीत लिहिलेला कागद किंवा चित्र चिकटवून ठेवायला काय हरकत आहे? ही मंडळी स्वतःच्या देशाबाहेर गेली की काय करतात कोण जाणे.

हा सर्व प्रवास रंगतदार झाला कारण आमची खळाळून हसणारी स्थानिक गाईड Gi Won (जि वॉन) हिच्यामुळे. तिला सगळी अद्ययावत माहिती तर होतीच पण उत्तम स्मरणशक्ती पण होती. केवळ दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आम्हा अठरा जणांची नावे विचारून मोबाईलमध्ये कोरियन भाषेत लिहून घेतली आणि प्रत्येकाला छोट्या स्टिकर्सवर लिहूनही दिली. त्यानंतर ती प्रत्येकाला न चुकता शेवटच्या दिवसापर्यंत नावाने ओळखत होती. गरज पडल्यास नावाने हाक मारत असे याचे कौतुक वाटले. संपूर्ण आठवडाभर वातावरण हसते खेळते राहिले. भारतीय रितीरिवाजांबद्दल तिला खूप औत्सुक्य होते. गंमत म्हणजे सकाळी प्रवासाला सुरुवात करताना आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणायचो तेव्हा ती मोरया ऐवजी कोरया म्हणते आहे हे एकीच्या लक्षात आले, तिला तसे सांगून अर्थ सांगितला असता Is it ? Really? असे म्हणत पुढे म्हणाली की “I thought you take the name of the country you are visiting.” एक प्रकारे तिचा तर्क बरोबरच होता नाही का? कधी कधी एखादी व्यक्ती कायम आपल्या लक्षात राहते. तशीच ही Gi Won उर्फ आयुषी (तिच्या विनंतीवरून तिचे आपल्या भाषेत केलेले बारसे). मार्शिअल आर्ट शिकलेली कोरियन भाई आमच्या कायम लक्षात राहील.

Tags