The journey, not the arrival, matters…. T.S. Eliot यांच्या पुस्तकातील ही ओळ वाचनात आली. याचा अर्थ गंतव्यापेक्षा प्रवास महत्त्वाचा आहे. आपण आयुष्यात जी उद्दिष्ट ठरवतो, ती गाठणं महत्त्वाचं असतंच. पण त्या अनेक उद्दिष्टांपर्यंत पोहचण्यासाठी आपण जो प्रवास करतो, त्यातील अनुभव, संघर्ष आणि आनंद हे अधिक मोलाचे ठरतात. या विचारांशी मी स्वतःला पूर्णपणे जोडू शकले. माझ्यासह सर्व केसरीयन्ससाठी प्रवासाची व्याख्या खरोखरंच वेगळी आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा प्रवास खास बनवण्याचे प्रयत्न करतात. मात्र, टूर लीडर्ससाठी या शब्दाचा अर्थ अधिक गहन ठरतो. कारण त्यांच्या नावातच याचं महत्त्व दडलंय. ‘टूर लीडर’ या दोन छोट्या शब्दांवर लाखो पर्यटक विश्वास ठेवतात आणि निर्धास्तपणे प्रवासाचा आनंद घेतात.
टूर लीडर बनणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं आणि ते गाठण्यासाठी त्यांनाही प्रवास करावा लागतो. या प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवातच अतुल्य भारतातील विविध डेस्टीनेशन्सपासून होते, ज्यांची वैविध्यता प्रत्येक पावलावर जाणवते. हे सगळं करताना त्यांना मार्गदर्शन, डेस्टीनेशन्सची माहिती, नियोजन आणि इतरही आवश्यक गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागते. या सगळ्यांचं भक्कम मूळ दडलं आहे केसरी भाऊंनी दिलेल्या ‘अतिथी देवो भवः’ या शिकवणमध्ये. भाऊ नेहमी म्हणायचे, ‘जसा देश, तसा वेश असावा’ यामागे त्यांचं एकच उद्दीष्ट होतं, ज्या राज्यात किंवा देशात जाऊ तिथली संस्कृती, राहणीमान, इतिहास, कला आणि परंपरा यांचा सखोल अभ्यास करत, पर्यटकांना ती माहिती सांगत त्यांना सहलीचं पुरेपूर मूल्य देणं. ही सर्व माहिती भाऊ सुंदर संवादशैलीत मांडायचे, जेणेकरून पर्यटकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावं. हा त्यांचा हातखंडा होता.
“भाऊंच्या मिश्किल गप्पा, हसतमुख स्वभाव आणि प्रत्येकाला आपलंसं करण्याची कला, हीच त्यांची खरी ओळख. जी आजही प्रत्येक टूरमध्ये टूर लीडर्सकडून अनुभवायला मिळते” हे पर्यटक आजही आवर्जून सांगतात. ‘टूर लीडर केवळ मार्गदर्शक नसतात, तर ते त्या क्षणांचे सहप्रवासी असतात’ ही भाऊंची शिकवण आजही जपली जात आहे. त्यांच्या या विचारांचा वारसा आणि केसरी डीएनए टूर लीडर्स आजही पुढे घेऊन जात आहेत. प्रत्येक डेस्टीनेशन आपल्याला काही ना काही नवीन शिकवून जातं. त्या ठिकाणांचं वैशिष्ट्य, संस्कृती, इतिहास आणि तिथल्या लोकांशी होणारा संवाद यामुळे दृष्टीकोन अधिक व्यापक होतो आणि विचार अधिक प्रगल्भ बनतात. विशेष म्हणजे, एखाद्या डेस्टीनेशनला परत पुन्हा पुन्हा भेट दिल्यानंतरही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन उमगतं, नवे अनुभव मिळतात आणि त्या ठिकाणाशी एक वेगळंच नातं निर्माण होतं. कदाचित म्हणूनच टूर लीडर्स प्रत्येक डेस्टीनेशनच्या प्रेमात पडतात. चला तर मग, त्यांच्या नजरेतून आणि अनुभवांतून काही सुंदर डेस्टीनेशन्स नव्याने अनुभवूया.
सिक्कीम दार्जिलिंग
उत्तर भारतातील वैविध्यपूर्ण प्रदेश ! लाचुंग ‘सिक्कीमचा ताज’, तर दार्जिलिंग ‘क्वीन ऑफ हिल्स’! सिक्कीमची राजधानी गँगटोक हे भारतातील सर्वात स्वच्छ हिल स्टेशन्सपैकी एक. दार्जिलिंगमधील टॉय ट्रेन अभियांत्रिकी चमत्कार असून, वर्तुळाकार रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करताना कांचनजंगाचं भव्य दृश्य दिसतं. ‘मेरे सपनो की रानी’ हे सदाबहार गाणं याच टॉय ट्रेनवर चित्रित झाल्यामुळे या ठिकाणाला अधिक लोकप्रियता मिळाली. पेलिंगमधील भारतातील पहिला ग्लास स्कायवॉक हे प्रमुख आकर्षण. सिक्कीममध्ये नामची हे एक महत्त्वाचं धार्मिक केंद्र असून चारधामची भव्य प्रतिकृती पाहायला मिळते. युमथांग व्हॅली ही ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखली जाते. जिथे वसंत ऋतूत सुंदर बहर पहायला मिळतो. युमथांग व्हॅलीच्या पुढे असलेला झिरो पॉईंट हा भाग वर्षभर बर्फाच्छादित असतो. गँगटोकमधील रुमटेक मठ हा बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मठ. या सर्वांमध्ये सर्वात हृदयस्पर्शी आणि भावनिक आकर्षण म्हणजे भारतीय वीर जवान बाबा हरभजन सिंह यांचं मंदिर. असं मानलं जातं की, शहीद झाल्यानंतर ते आजही आशीर्वादाच्या स्वरूपात भारतीय सैन्याच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या नावाने एक स्वतंत्र खोली आहे, जिथे त्यांचा युनिफॉर्म रोज स्वच्छ करून ठेवला जातो. काही सैनिकांच्या अनुभवानुसार, त्यांच्या गोष्टींवर बर्फ किंवा माती लागलेली दिसते, जणू त्या त्यांनी वापरल्या आहेत. या प्रवासाचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे.
लेह लडाख
अनेक टूर लीडर्ससाठी ऑब्सेशन! इथे वाळवंट, पर्वत आणि बर्फ यांचा अद्भुत संगम दिसतो. फोटोग्राफ्री प्रेमींसाठी हा स्वर्गच ! नुब्रा व्हॅलीतील कोल्ड डेझर्ट मस्ट सी. पँगाँग त्सो लेक पाहिल्यावर असं वाटतं की, हे सरोवर खरंच आहे की, स्वप्न ? या ठिकाणी आमची हॉटेल प्रॉपर्टी इतक्या उत्तम ठिकाणी आहे की, पँगाँग त्सो लेकचा नजारा थेट रूममधूनही दिसतो. मग येतो सगळ्यात रहस्यमय अनुभव… मॅग्नेटिक हिल ! गाडी स्वतःच वर जात आहे असं वाटतं, पण हे खरं आहे की फक्त भास? हे इथे थांबून प्रत्येकजण अनुभवतोच. तुर्तुक हे भारतातील शेवटचं गाव जे LOC जवळ आहे, जगातील हायेस्ट मोटरेबल रोडपैकी एक खारदुंगला शांततेचा एक अद्भुत अनुभव देणारा डिस्किट पास, मठ… अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं इथे आहेत. या प्रवासामागे एक भावनिक वास्तवही आहे ते म्हणजे कारगिल वॉर मेमोरियल इथे सैनिक स्वतः कारगिल युद्धाची कथा सांगतात. ज्या ऐकताना मन दाटून येतं. सियाचेन ग्लेशियर हे जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र आहे, जिथे आपले सैनिक दिवसरात्र तैनात असतात. हॉल ऑफ फेम वॉर म्युझियम हे भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित संग्रहालय असून वीरतेच्या कथा इथे जिवंत होतात. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दरम्यानची टूर विशेष पद्धतीने साजरी केली जाते. तसंच रक्षाबंधनाच्यावेळी महिला पर्यटक आपल्या भारतीय जवानांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करतात.
भूतान
ज्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत त्या प्रत्यक्षात इतक्या सुंदर कशा असू शकतात ? हे इथे आल्यावरच कळतं. हा जगातील एकमेव कार्बन – निगेटिव्ह देश आहे. इथे साधारण ७० टक्के भूभाग वनराईने व्यापलेला आहे, ज्यामुळे इथली हवा अत्यंत शुद्ध आहे. या देशाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे Gross National Happiness, जिथे आर्थिक विकासापेक्षा लोकांच्या आनंदाला अधिक महत्त्व दिलं जातं. थिंफूमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी मनाला भावतो तो किंग्ज मेमोरियल चोर्टेन. शांतता, श्रद्धा आणि प्रार्थनेचं एक सुंदर केंद्र. जिथे स्थानिक दररोज प्रार्थनेसाठी येतात. थिंपू खोऱ्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी बुद्ध पॉईंट हे ठिकाण खूपच खास आहे. पारो खोऱ्यात गेल्यावर सर्वात अविश्वसनीय अनुभव मिळतो टायगर्स नेस्ट पाहण्याचा. कड्यावर असणारा हा मठ म्हणजे सर्वात आयकॉनिक प्लेस. इथे प्रत्येक ठिकाणी मन खरोखर शांत होतं. म्हणून आम्ही पर्यटकांना नेहमी सांगतो की, भूतान हे डेस्टिनेशन नाही, तर एक फिलिंग आहे.
लाहौल स्पिती चंद्रताल
हिमाचल म्हंटलं की, शिमला, मनाली, धरमशाला, डलहौसी आठवतं, पण जेव्हा आपण लाहौल स्पितीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा जाणवतं हा हिमाचलचा एक untouched भाग आहे. लाहौल आणि स्पिती हे दोन वेगळे प्रदेश. स्पिती हा थंड, कोरडा आणि ओसाड असून इथे विस्तीर्ण माळराने दिसतात तर लाहौलमध्ये निसर्गसौंदर्य पहायला मिळतं. इथली की मॉनेस्ट्री, टाबो मॉनेस्ट्री आणि धनकर मॉनेस्ट्री हे प्राचीन बौद्ध मठ मनाला शांतता देतात. या प्रवासातील खास आकर्षण म्हणजे अटल टनेलमधून जाण्याचा अनोखा अनुभव, रोहतांग पासमधून रोमांचक प्रवास. बर्फाच्छादित पर्वत, वळणावळणाचे रस्ते आणि मनमोहक दृश्यं भावतं. प्रवासातील अजून एक आकर्षण… चंद्रताल. साधारण १४ हजार फूट उंचीवरचं सरोवर. इथे आपण टेंटमध्ये एक रात्र राहतो. आकाशात दिसणारे तारे, आजूबाजूची शांतता आणि निसर्गाचा भव्य आविष्कार हे सगळं अनुभवताना शब्द अपुरे पडतात. शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाशी एकरूप होण्याची आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची ही उत्तम संधी.
मंडळी, विविधतेने नटलेले देश-विदेश अनुभवताना आपण नवनवीन ठिकाणं पाहतोच; पण त्या प्रवासात नकळत जुळणारी नाती हीच सर्वात मोठी देण. हसरे क्षण, नवीन मित्र-मैत्रिणी आणि अनोखे अनुभव हे सगळं एका प्रवासात अनुभवायला मिळतं. या सगळ्यांना एकत्र बांधणारा दुवा म्हणजे केसरीचं आपलं माणूस. चला तर मग, आठवणी, आनंद आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेल्या एका सुंदर प्रवासाला !




