जिथे आजही अखंड तेवत आहे शिव-पार्वतीच्या विवाहाची ज्योत!

या वर्षीच्या आमच्या पहिल्या Chardham Yatra चा अनुभव!

Yamunotri Dham आणि Gangotri Dhamचं दर्शन केल्यानंतर आम्ही Kedarnath Dhamच्या दिशेने प्रवास करत होतो. शिवभक्तांसाठी हा प्रवास अत्यंत भावनिक असतो. पर्यटकांच्या मनात केदारनाथ दर्शनाची प्रचंड ओढ जाणवत होती. बसमध्येही उत्साहाने चर्चा सुरू होती.

कोणी विचारत होतं,

”मंदिर पहिल्यांदा दिसतं तो क्षण कसा असतो?”

तर कोणी म्हणत होतं,

”इतक्या उंचीवर हे शिवमंदिर कसं बांधलं असेल?”

अशा अनेक गप्पा रंगल्या होत्या. मी सगळ्यांचं बोलणं ऐकत होतो.

हिमालयातील प्रत्येक वाटेवर कथा आहे, पुराण आहे आणि कमी परिचित मंदिरांच्या रूपात त्या आजही जिवंत आहेत. यात्रेमध्ये प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष अनुभवता आलं नाही, तरी त्याच्या कथा प्रवासाला समृद्ध करतात. म्हणूनच अशा ठिकाणांची माहिती कथांच्या स्वरूपात पर्यटकांना सांगणं, त्यांना त्या अनुभवांशी जोडणं आणि त्यांचा प्रवास अधिक अर्थपूर्ण बनवणं ही माझी आवडती गोष्ट. कारण या ठिकाणांविषयी ऐकताना पर्यटक चारधाम यात्रेचा अनुभव अधिक खोलवर अनुभवू लागतात.

थोड्या वेळाने मी माईक हातात घेतला आणि म्हणालो,

”मंडळी, हिमालयाला भगवान शिवाचं निवासस्थान मानतात, पण याच हिमालयात एक असं ठिकाण आहे, जिथे भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, अशी श्रद्धा आहे. ते ठिकाण म्हणजे त्रियुगीनारायण मंदिर. भगवान विष्णूंनी पार्वतीचे भाऊ म्हणून कन्यादान केलं, तर ब्रह्मदेवाने विवाह विधी पूर्ण केल्याचं मानलं जातं. या मंदिराचं दगडी बांधकाम, वास्तुकला आणि मंदिराची शैली केदारनाथशी साधर्म्य दाखवतं.”

हे ऐकताच अनेकांनी उत्सुकतेने एकमेकांकडे पाहिलं.

मी पुढे म्हणालो,

‘शिव-पार्वतीच्या विवाहावेळी प्रज्वलित झालेली ज्योत आजही अखंड तेवत आहे असं मानलं जातं.”

हे ऐकताच बसमध्ये कुजबुज सुरू झाली.

”शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा तो क्षण नेमका कसा असेल?  देवांच्या मंत्रघोषात संपूर्ण सृष्टीने त्या प्रेमाला नतमस्तक होऊन पाहिलं असेल.”

मग, एका आजींनी म्हटलं, ”म्हणजे आपण आज त्या परिसरात आहोत, जिथे शिव-पार्वतीचं लग्न झालं होतं! अहो, भाग्यच आहे हे!”

त्यांच्या बोलण्यात जितकी उत्सुकता होती, तितकीच भावना देखील होती.

मंडळी, अलिकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी त्रियुगीनारायण मंदिरात जाऊन विवाह करत असल्यामुळे हे मंदिर अधिक चर्चेत येऊ लागलं आहे. केदारनाथच्या पर्वतरांगांमध्ये अजूनही कितीतरी कथा दडलेल्या आहेत. जेव्हा आपण चारधाम किंवा कैलास मानसरोवर अशा मोठ्या यात्रांवर निघतो, तेव्हा तिथल्या कथा आणि त्याच्या भावनाही अनुभवतो. यात्रेकरू बदलतात, अनुभव वेगळे असतात पण या आणि अशा अनेक कथा प्रत्येक यात्रेला भावनांनी जोडून ठेवणारा एक सुंदर दुवा बनून राहतात! 

Tags