जपान चायना

मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो “तुमचं सर्वात आवडतं पर्यटनस्थळ कोणतं?”

या प्रश्नाचं उत्तर देताना माझा नेहमीच गोंधळ उडतो, कारण मला संपूर्ण जगच प्रिय आहे. मात्र, असे दोन देश आहेत ज्यांनी माझ्या मनावर कायमची छाप सोडली, जपान आणि चायना. हे दोन्ही देश एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असले, तरी या दोन्ही देशांनी मला आशियाच्या दोन वेगवेगळ्या पण तितक्याच प्रेरणादायी रूपांची ओळख करून दिली.

केवळ निसर्गसौंदर्यामुळे नव्हे, तर जपान मधली स्वच्छता, समृद्ध संस्कृती, लोकांचा शिस्तबद्ध स्वभाव, त्यांचं आदरातिथ्य, वेळेचं काटेकोर नियोजन आणि वक्तशीरपणा या सगळ्यांनी मला अक्षरशः भारावून टाकलं.

या देशाच्या मातीमध्ये, हवेमध्ये आणि संस्कृतीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. सौंदर्य, संवेदनशीलता आणि आदर या मूल्यांचा प्रत्येक ठिकाणी सहज प्रत्यय येतो. जपानी लोकांचं खरं सौंदर्य त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक भाव, साधेपणा आणि नम्रतेत दिसून येतं. इथल्या मुली बाहुलीसारख्या गोड वाटतात, तर आपल्या भारतीय महिलांना पारंपरिक किमोनो परिधान करण्याचं विशेष आकर्षण असतं. म्हणूनच म्हणते, जपानमध्ये आलात तर किमोनो परिधान करा, सुंदर आठवणी जपा, छायाचित्रं आणि रील्स तयार करा, मनमुराद आनंद घ्या आणि जपानच्या संस्कृतीशी एकरूप व्हा.

जपानमधील माउंट फुजीचा अनुभव तर शब्दांत मांडणं कठीण आहे. आपल्या देशात जसं कैलास दर्शनाला अत्यंत पवित्र आणि अवर्णनीय स्थान आहे, तसंच जपानी लोकांच्या भावविश्वात माउंट फुजीचं स्थान आहे. या पर्वताशी त्यांच्या भावना आणि श्रद्धा घट्ट जोडलेल्या आहेत.

सुंदर जपानी गार्डन्स, नयनरम्य सरोवरं, शांत मंदिरं, रम्य उद्यानं आणि प्रत्येक ठिकाणी जाणवणारी निसर्गाशी असलेली सुसंवादाची भावना – हे सगळं प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जपानला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

तर दुसरीकडे, चायना आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान विकास आणि अभियांत्रिकीच्या चमत्कारांनी प्रत्येक क्षणी आश्चर्यचकित करतो.

नुकतीच पुन्हा एकदा बीजिंगला जाण्याची संधी मिळाली. शहरात अनेक सकारात्मक बदल जाणवले. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं हे शहर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करताना दिसतं. कमकुवत झाडांना सलाईनसारख्या पिशव्यांद्वारे आवश्यक पोषणद्रव्यं पुरवली जातात. पर्यावरणाबद्दलचा हा दृष्टिकोन खरोखर प्रेरणादायी वाटला.

शहरभर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं धावताना दिसतात. सध्या जवळपास 60 ते 100 सक्रिय चायनीज ईव्ही ब्रँड्स बाजारात आहेत. जागतिक ईव्ही बाजारपेठेत चायनाचा वाटा सुमारे 60 टक्के असून भारताचा वाटा सुमारे 3 ते 4 टक्के आहे. यावरून या क्षेत्रातील त्यांची आघाडी स्पष्टपणे जाणवते.

यानंतर आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील एका कंपनीला भेट दिली. तिथले अनुभव अक्षरशः भविष्याची झलक दाखवणारे होते. स्मार्ट चष्म्याच्या सहाय्याने कोणतीही भाषा त्वरित इंग्रजीत वाचता येते, एआयच्या माध्यमातून अल्बर्ट आइन्स्टाइन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतो, तर रुग्णालयांमधील आधुनिक एआय तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिकही अनुभवता आलं. औद्योगिक क्षेत्रातही चायना आघाडीवर असून जगातील 54 टक्क्यांहून अधिक औद्योगिक रोबोट्स एकट्या चायनामध्ये कार्यरत आहेत.

पर्यटनाच्या दृष्टीनेही चायनाने अफाट प्रगती केली आहे. बीजिंग म्हणजे राजेशाही वारसा, फॉरबिडन सिटी, विस्तीर्ण हिरवळ, पर्वतरांगा आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानली जाणारी ग्रेट वॉल ऑफ चायना. केबल कार किंवा फनिक्युलर ट्राममधून प्रवास करताना या भव्य वास्तूचं आणि सभोवतालच्या पर्वतरांगांचं दृश्य अविस्मरणीय ठरतं.

शांघाय हे आधुनिक चायनाचं धडधडतं हृदय आहे. संध्याकाळी सात वाजता एकाच वेळी उजळणाऱ्या गगनचुंबी इमारती, हुआंगपू नदीच्या दोन्ही काठांवरील जुन्या आणि नव्या वास्तुकलेचा सुंदर मिलाफ, जिन माओ टॉवर आणि प्रसिद्ध ERA अॅक्रोबॅटिक शो—हे सर्व प्रकाशयोजना, वास्तुकला आणि कलात्मकतेचा अप्रतिम संगम अनुभवायला देतात.

झांगजियाजी पर्वतरांगांनी अवतार चित्रपटानंतर जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली. येथे जगातील सर्वात उंच आउटडोअर ग्लास लिफ्ट अर्थात बैलॉन्ग एलिव्हेटरचा थरार अनुभवता येतो, तसेच जमिनीपासून तब्बल १००० फूट उंच असलेल्या झांगजियाजी ग्लास ब्रिजवर चालण्याचा अनुभव अंगावर शहारे आणतो.

तर चोंगकिंग शहरात १९ मजली इमारतीतून धावणारी मोनोरेल ही मानवी कल्पकता आणि नियोजनाचा एक विलक्षण नमुना आहे. अत्याधुनिक ध्वनिरोधक तंत्रज्ञानामुळे रहिवाशांना कोणताही त्रास न होता ही व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे.

जपान मनाला शांततेचा, संस्कृतीचा आणि सौंदर्याचा स्पर्श करून जातो, तर चायना भविष्याचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानाची, वेगवान विकासाची आणि मानवी कल्पकतेची प्रचीती देतो. एकीकडे परंपरेची मोहिनी, तर दुसरीकडे आधुनिकतेची झेप—या दोन्ही देशांची सफर म्हणजे आशियाच्या दोन वेगळ्या पण तितक्याच प्रेरणादायी रूपांचा अविस्मरणीय अनुभव.

आणि या दोन्ही देशांचा प्रवास केसरीच्या उत्कृष्ट नियोजनासह, दर्जेदार हॉटेल्स, चविष्ट भोजन आणि केसरीच्या आपल्या माणसाच्या म्हणजेच अनुभवी टूर मॅनेजर्सच्या साथीने अधिक सुखद, सुरक्षित आणि अविस्मरणीय ठरतो. एकदा तरी जपान आणि चायनाची ही अनोखी सफर जरूर अनुभवायला हवी, फक्त केसरीसोबत!

Tags