अनोळखी पायवाटेवर सापडलेला स्वर्ग!
फोटोग्राफी, ट्रेकिंग किंवा निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हा एक परिपूर्ण अनुभव. इथे उमलणारं प्रत्येक फूल, प्रत्येक वनस्पती आणि वाहणारा वारा आपल्याला एकच गोष्ट सांगतो… निसर्ग स्वतःच्या नियमांनुसार चालतो आणि त्याच्या शिस्तीतच आपल्या जीवनाचा समतोल दडलेला आहे!
“Glowing spider among dozens of new species discovered in Angola’s remote highlands” ही बातमी नुकतीच वाचली…
आफ्रिकेतील अंगोलाच्या दुर्गम पर्वतीय भागात संशोधकांना निळसर प्रकाश परावर्तित करणारा कोळी, नव्या प्रकारची फुलपाखरं आणि इतर अनेक नवीन प्रजाती आढळल्या. हे वाचल्यानंतर पुन्हा एकदा मनात विचार आला की, निसर्ग आपल्याला अद्भुत आश्चर्यांची अमूल्य भेट कायम देत आहे.
पण अशीही अनेक उदाहरणं आहेत की, काही महत्त्वाचे शोध मोठ्या संशोधनामुळे नव्हे, तर निव्वळ योगायोगाने लागलेत. एखाद्या अनोळखी पायवाटेवरून चालताना किंवा उत्खननादरम्यान अनेक अद्भुत गोष्टी सापडल्या. कधी प्राचीन संस्कृतींची शहरं, पुरातन लेणी, तर कधी निसर्गाने आपल्या कुशीत जपून ठेवलेली अनमोल वनसंपदा जगासमोर आली.
निसर्गाने जपून ठेवलेल्या या गोष्टी केवळ सौंदर्यापुरत्या मर्यादित नाहीत; त्यामध्ये आरोग्याशी संबंधित मौल्यवान ज्ञानही दडलंय. आजही जगातील अनेक आधुनिक औषधांचा उगम वनस्पतींमध्ये सापडतो. आपल्या पुराणांमध्येही याचे अनेक संदर्भ आढळतात. रामायणात लक्ष्मणाला दुखापत झाल्यानंतर भगवान हनुमान संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हिमालयात जातात. नेमकी संजीवनी ओळखता न आल्याने ते संपूर्ण पर्वतच उचलून आणतात, अशी कथा सांगितली जाते.
दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest हजारो औषधी वनस्पतींचं घर मानलं जातं. तिबेटचे पठारी प्रदेश आणि हिमालयातील अनेक भाग जैवविविधता व औषधी वनस्पतींसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आपल्या देशातही अशा अनेक निसर्गसंपदा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे उत्तराखंडमधील Valley of Flowers National Park!
Unesco World Heritage Site Valley Of Flowers चा शोधही योगायोगानेच लागला. १९३१ साली ब्रिटिश गिर्यारोहक Frank Smythe आणि त्यांचे सहकारी हे Mount Kamet सर करून परतीच्या प्रवासात असताना, अनोळख्या वाटांमधून मार्ग काढत जात होते. त्यांना अचानक एक सुंदर व्हॅली दिसली… नजर जाईल तिथपर्यंत रंगीबेरंगी फुलांचे गालिचे!
फ्रँक स्माइथ यांनी या प्रदेशाचा अभ्यास करून The Valley of Flowers हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी आपल्या मोहिमेचे अनुभव, दुर्मिळ वनस्पती आणि इथल्या जैवविविधतेची माहिती दिली. त्यानंतर ही व्हॅली जगभर परिचित झाली आणि एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाली.
जुलै आणि ऑगस्ट हे या व्हॅलीला भेट देण्यासाठीचे सर्वोत्तम महिने मानले जातात. जूनच्या अखेरीस बर्फ वितळायला सुरुवात होते आणि काही आठवड्यांतच संपूर्ण परिसर फुलांनी बहरतो. विशेष म्हणजे इथे सतत नवनवीन फुलं उमलतात. काही प्रजाती केवळ दोन ते तीन आठवडेच फुलतात. दुर्मिळ ब्रह्मकमळ (Saussurea obvallata) हे देखील या प्रदेशातील विशेष आकर्षण आहे. याशिवाय Himalayan Blue Poppy, Cobra Lily, Primula, Anemone, Wild Geranium, Delphinium आणि अनेक फुलं, वनस्पती आढळतात.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सइतकाच इथपर्यंतचा प्रवासही मोहक आहे. Govind Ghat हे या ट्रेकचं बेस कॅम्प. इथून Ghangaria पर्यंत साधारण ११ किलोमीटरचा ट्रेक आपण टूरमध्ये करतो. घांगरियामध्ये पोहोचल्यानंतर संध्याकाळी एका सरकारी डोममध्ये डॉक्युमेंट्री पाहतो, ज्यामध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि Gurdwara Hemkund Sahib यांविषयी माहिती दिली जाते. ज्यामुळे पुढील प्रवासासाठीची आवश्यक तयारी करता येते. घांगरियाहून व्हॅली ऑफ फ्लॉवर्सपर्यंत साधारण ४ किलोमीटरचा ट्रेक आहे. इथे पोहोचताच रंगीबेरंगी फुलांनी सजलेली दरी नजरेत कायमची साठून जाते. यानंतर आपण शीख धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र श्री हेमकुंड साहिब गुरुद्वाराला भेट देतो.
फोटोग्राफी, ट्रेकिंग किंवा निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हा एक परिपूर्ण अनुभव ठरतो. इथून परतताना पर्यटक केवळ सुंदर छायाचित्रे घेऊन येत नाहीत; ते सोबत घेऊन येतात निसर्गाविषयीचा आदर, आश्चर्य आणि त्याच्याकडून शिकण्याची नवी प्रेरणा!
