जिद्द, रोमांच आणि अभिमान!

केसरीने नुकताच 42 वा वर्धापनदिन साजरा केला.

42 हा फक्त एक आकडा नाही; हा एका स्वप्नाचा श्वास आहे, एका कुटुंबाचा संघर्ष आहे आणि लाखो भारतीयांच्या पहिल्या परदेश प्रवासाचा विश्वास आहे.

1984 साली जेव्हा बहुतेक जण निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत असतात, त्या वयाच्या पन्नाशीत केसरी भाऊ पाटील यांनी सुनीता ताईंच्या साथीने एक धाडसी निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य होती, पण स्वप्न मात्र अफाट होतं. भूगोलाचे शिक्षक असलेल्या भाऊंनी नकाशावरचं जग भारतीयांना प्रत्यक्ष दाखवायचं ठरवलं आणि त्या जिद्दीमधूनच आजच्या केसरी टूर्सचा जन्म झाला.

परंतु, हा प्रवास कुणा एकट्याचा नव्हता!

वीणा ताईंची दूरदृष्टी, शैलेशदांचं तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील नेतृत्व, हिमांशूची तरुणाईची ऊर्जा, झेलम ताईंची शांत पण भक्कम साथ आणि संगीता ताईंची अविरत मेहनत या सगळ्यांच्या योगदानातून केसरी टूर्सचा हा वटवृक्ष बहरत गेला.

भाऊंमागे नेहमी सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या संगीता ताईनी सेल्स टीमची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेत ती समर्थपणे सांभाळली. प्रत्येक टूर कन्सल्टंटला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलं आणि आणि ग्राहकांचा पहिला फोन ते शेवटचा धन्यवाद सगळं अगदी आपुलकीने सांभाळलं. आज कंपनीच्या संचालक मंडळात शैलेश केसरी पाटील, हिमांशू केसरी पाटील, झेलम अमित चौबल यांच्यासोबत – संगीता शैलेश पाटील यांचं नाव अभिमानाने झळकतं.

तेव्हा माहीममध्ये एक छोटंसं ऑफिस होतं; आज देशभरात 26 शाखा, 792 कर्मचारी आणि 350 हून अधिक एक्स्पर्ट टूर लीडर्सचा विशाल परिवार आहे. देशविदेशातील ग्रुप टूर्स सोबत खास महिलांसाठी माय फेअर लेडी, जेष्ठ नागरिकांसाठी सेकंड इनिंग्स टूर्स, मोजक्याच दिवसांच्या छोटा ब्रेक टूर्स तर कॉर्पोरेटसाठी MICE टूर्सही आहेत. तेव्हा फक्त भारतभर फिरण्याचं स्वप्न होतं; आज थेट अंटार्क्टिकापर्यंत उड्डाणं आहेत.

आज 42 वर्षांनंतरही केसरी म्हणजे तोच विश्वास, तीच साथ आणि तीच आपुलकी टूर संपल्यानंतर एखादा पर्यटक हसतमुखाने “एक नंबर!” असं म्हणतो, तेव्हा आजही अंगावर रोमांच उभे राहतात. त्या एका क्षणात हजारो किलोमीटरचा प्रवास असंख्य दिवसांची मेहनत आणि वर्षानुवर्षांची निष्ठा सार्थकी लागल्यासारखं वाटतं.

काळासोबत केसरीही बदलत आहे. अर्जुन आणि आदित्य यांच्या रूपाने तिसरी पिढी या प्रवासात सहभागी होत आहे. नव्या कल्पना, नवं तंत्रज्ञान आणि नव्या उंची गाठण्याची तयारी सुरू आहे. सगळं अपग्रेड होतंय.

भारतीयांना हात धरून जग दाखवणं आणि जगाला भारताची ओळख करून देणं हेच केसरीचं ध्येय. आई-वडिलांचा पहिला विमानप्रवास, नवदांपत्याचा पहिला परदेश दौरा, निवृत्त शिक्षकाची युरोप सहल किंवा मित्रमंडळींची स्वप्नातील टूर प्रत्येक प्रवासामागे केसरी भाऊंची दूरदृष्टी आणि हजारो केसरियन्सची निष्ठा उभी आहे.

आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, पर्यटन क्षेत्रात आमची ओळख केवळ टूर पॅकेजेसमुळे नाही. तर ती निर्माण झाली आहे विश्वासामुळे, माणुसकीमुळे, सेवाभावामुळे आणि चार दशकांहून अधिक काळ जपलेल्या नात्यांमुळे.

या वर्धापनदिनाच्या क्षणी डोळे पाणावतात, छाती अभिमानाने भरून येते आणि मन कृतज्ञतेने नतमस्तक होतं. कारण हा प्रवास अजून संपलेला नाही; ही तर फक्त नव्या पर्वाची सुरुवात आहे.

केसरी भाऊ, आपली जिद्द आणि दूरदृष्टी आम्हाला कायम प्रेरणा देत राहो. शैलेशदा, हिमांशू, झेलम ताई आणि संगीता ताई आपल्या नेतृत्वाला आणि योगदानाला माझा मनःपूर्वक सलाम.

42 वर्षांची ही गौरवशाली वाटचाल नव्या स्वप्नांना दिशा देत, नव्या क्षितिजांचा वेध घेत आणि लाखो पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत पुढील अनेक दशकं अशीच अविरत सुरू राहो, हीच माझी ईश्वरचरणी शुभेच्छा.

आपलाच राज
टूर लीडर 34 वर्ष सातत्याने केसरीसोबत!

Tags