भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संपत्तीचा ठेवा !

केसरी मारिगोल्ड – मंगलमय यात्रा !

नुकत्याच झालेल्या मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ जो धार्मिक सण, व्रत, साधना आणि चिंतन करण्यासाठी शुभ मानला जातो आणि कालच साजरी झालेली दत्तजयंती. सृष्टीचे निर्माते ब्रह्मा, त्याचं संवर्धन करणारे विष्णू आणि वाईट गोष्टींचा नाश करणारे शिव शंकर … या तिन्ही देवांचा वास दत्तरूपात असल्याची मान्यता आहे. या त्रिगुणात्मक रूपांचं दर्शन एकाच ठिकाणी देणारी गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ते गिरनार पर्वत… यांसह दत्तांची इतर धार्मिक स्थळे दत्तजयंतीनिमित्त भक्तीरसात न्हाऊन निघाली. देशातील विविध ठिकाणी पार पडलेल्या या सोहळ्यात एक समान धागा दिसला… तो म्हणजे श्रद्धेचा! 

धार्मिक स्थळांना भेट देताना देव देवळात नाही तर तो भक्तांसोबत रमल्याची प्रचिती दिसून येते ती पंढरपूरच्या वारीत. आपल्यासोबत पांडुरंग चालतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा असल्याने ते एकमेकांना माऊली म्हणत, वैष्णोदेवीच्या यात्रेत जय माता दीचा गजर, गिरनार पर्वत चढताना दत्तांचं नामस्मरण तर अमरनाथ यात्रेत बाबा बर्फानी शिव शंकराचा जयघोष ! देवांचा हा जागर करत प्रत्येक भाविक श्रद्धेच्याच बळावर ऊन, वारा, पाऊस, बर्फवृष्टी अशा अनेक आव्हानांना सामोरं जात आध्यात्मिक आनंद घेताना दिसतात. तर दूसरीकडे भारताची ही आध्यात्मिक संपत्ती आणि हजारो वर्षांपूर्वीची वास्तुस्थापत्यशैली अभ्यासण्यास अनेक जिज्ञासू मंडळी या तीर्थस्थळांना आवर्जून भेट देतात.

हरिद्वारला गंगेच्या प्रवाहात परडीतून दिवे सोडण्याचा आनंद, अष्टविनायकातील मयुरेश्वर मंदिराच्या परिसरातील दिपमाळेचं प्रज्वलन, अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या सानिध्यात लंगरचा आस्वाद, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चढवला जाणारा छप्पन भोग असो… असे अनेक क्षण अनुभवताना आध्यात्मिक समाधान मिळतंच, तसंच ही धार्मिक स्थळं उभारतानाची स्थापत्यशैली, तंत्रज्ञान आणि पूर्वजांची दूरदृष्टी पाहता त्यांना आपसूकच नतमस्तक व्हायला होतं. उत्तर भारताच्या हिमाचलमधील 51 शक्तीपीठांपैकी एक ज्वालाजी मंदिरात कायम तेवत असणारी ज्वाला, हिमालयातील बर्फ वितळताना त्याच्या ठिबकणाऱ्या पाण्यापासून नैसर्गिकरित्या तयार होणारी अमरनाथ गुहेतील शंकराची पिंड, एका आख्यायिकेनुसार हिडिंबा राक्षसीने तपश्चर्या करून सात्विक वृत्ती मिळवली म्हणून तिला पूजण्यासाठी उभारलेलं मनालीतील हिडिंबा मंदिर, शहीद भारतीय सैनिक बाबा हरभजन सिंग यांना समर्पित सिक्कीममधील मंदिर आस्थेचा केंद्रबिंदू आहे… अशी मान्यता आहे की आजही ते भारतीय सैनिकांच्या स्वप्नात येत शत्रूंच्या कटाची माहिती देतात आणि ती माहिती खरीही ठरते! उत्तरांचलमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ जे महाप्रलयातही स्तब्ध राहिलं, जिथे महाभारताचं युद्ध घडलं आणि वेदांचं जन्मस्थान असलेलं हरयाणातील कुरूक्षेत्र… असं प्रत्येक ठिकाण आपलं वैविध्य जोपासून आहे.

तर दक्षिण भारतातील गोपुरम आणि लोककला प्रत्येक पावलांवर सुखावते. तामिळनाडूमध्ये एका छोट्याशा टेकडीवर पक्षीतीर्थम नावाचं ठिकाण आहे जेथील शिवमंदिराच्या बाहेर गरूड अन्नप्राशन करण्यास येतात, कावेरी नदीकाठचं बृहडेश्वर मंदिर, केरळमधील गुरूवायूर मंदिर जिथे हत्तींचा महोत्सव पार पडतो ज्यावेळी त्यांना सजवत भव्य मिरवणूक काढली जाते, तर स्वामी विवेकानंद ध्यान करत असताना त्यांना जिथे दिव्य उर्जा जाणवली ते कन्याकुमारीतील त्यांचं रॉक मेमोरिअल. पूर्व भारताच्या ओडिशातील जगन्नाथ मंदिराच्या कळसावरील झेंडा जो वाऱ्याच्या उलट्या दिशेला फडकतो, आरोग्य आणि उर्जेचे प्रतीक असणाऱ्या सूर्यदेवाला समर्पित कोणार्क सूर्य मंदिर. पश्चिम भारतात महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या चरणांना स्पर्श करणारा सूर्यकिरणोत्सव, गुजरातमध्ये पाण्याखाली बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका, अरबी समुद्र किनाऱ्यावर स्थित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमनाथ मंदिर तर राजस्थानच्या बिकानेर येथील करणी माता मंदिर जिथे हजारो उंदीर फिरतात. तर शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला ते नेपाळमधील लुंबिनी… अशी अनेक तीर्थस्थळे पाहताना मनात कुतूहल निर्माण होतं.

मंडळी, हे सर्व पाहताना आपल्या देशाचा आध्यात्मिक वारसा अखंड असून त्याचं गारूड जगभर विस्तारल्याचं जाणवतं. म्हणूनच अलिकडे तरूणांचा तसंच परदेशातील पर्यटकांचा तीर्थाटनाकडे कल वाढत असून चारधाम, अमरनाथ यांसारख्या आव्हानात्मक यात्रांना मोठ्या संख्येने भाविक येताहेत. विशेष म्हणजे हे सारं काही केसरीच्या तीर्थक्षेत्रांची मंगलमय यात्रा मारीगोल्डमध्ये अनुभवायला मिळत असल्याचे अभिप्राय भाविकांकडून मिळत आहेत. ज्याचं खूप मोठं समाधान वाटतं आणि त्यातूनच निर्माण होतात नाविन्यपूर्ण यात्रा. तर मंडळी येणाऱ्या नव्या वर्षात तीर्थाटनाचा संकल्प करा आणि सांस्कृतिक आणि भारताची ही प्राचीन आध्यात्मिक संपत्ती अनुभवायला चला, फक्त केसरी मारीगोल्डसोबत !

Tags