आपला वाढदिवस किंवा प्रकटदिन हा आपल्या आयुष्यात दरवर्षी येणारा खास दिवस. या दिवशी नातेवाईक, मित्र मैत्रिणी आपल्याला शुभेच्छा देतात आणि त्याने मन सुखावते. या दिवशी काही विशेष घडले तर मात्र ती एक आयुष्यभराची आठवण ठरते. यंदाचा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहिल, असाच होता. निमित्त होते, हरका बहादूर आर्मी गुडविल स्कुलला दिलेल्या भेटीचे. आपले भारतीय जवान केवळ आपल्या सीमारेषेचीच काळजी घेत नाहीत, तर सीमारेषेजवळील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिमाग से दिल तक या उपक्रमाअंतर्गत नेहमीच कार्यरत असतात. कारगिल येथील अतिदुर्गम्य भागातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय सैन्याने हरका बहादूर आर्मी गुडविल स्कूलची स्थापना केली असून हा या भागातील अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या शाळेत नर्सरीपासून दहावीपर्यंत सुमारे साडे पाचशे विद्यार्थी भारतीय सैन्याच्या शिस्तीत व स्थानिक तज्ञ शिक्षकांच्या देखरेखीत शिक्षण घेत आहेत. अत्यल्प दरात या विद्यार्थ्यांना इथे शिक्षण मिळते. या शाळेची एक अडचण होती ती म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांना ये-जा करताना थांबावे लागे, कारण प्रवासासाठी सैन्याच्या गाड्या अपुऱ्या पडत असत. त्यांना स्कुल बसची अतिशय आवश्यकता होती. जेणेकरून या विद्यार्थ्यांची ने-आण करणे सोपे आणि जलद होईल. या क्षेत्रात सामाजिक कार्य करत असलेल्या सरहद संस्थेच्या संजय नहार सरांनी विद्यार्थ्यांची अडचण केसरीपर्यंत पोहचवली. केसरी टूर्स आपले CSR फंड नेहमीच जवानांसाठी किंवा जवानांद्वारे चालणाऱ्या उपक्रमांसाठी वापरात असते. त्यातून या वर्षी या शाळेला ४५ सीटर स्कुल बस दयायचे ठरले आणि काही महिन्यातच ही बस कारगीलला रवानाही झाली. या बस उद्घाटनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आम्ही भेटावे, अशी विद्याथ्यांची इच्छा होती. म्हणूनच आम्ही खास त्यांना भेटायला गेलो. त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
गोरखा रेजीमेंटचे हरका बहादूर या शूरवीर सैनिकाने १९४७ साली वीरमरण पत्करून युद्धात कारगीलचा ब्रिज आणि आपली सीमारेषा अतिशय जिकरीने सांभाळली. या शाळेच्या जवळ या शूर हुतात्म्याचे स्मारकही आहे. त्यांच्या शौर्याला स्मरून त्यांच्या स्मारकापुढे आम्ही आपोआप नतमस्तक झालो. सध्या वापरात नसला तरी आपण आज हा ब्रिज जतन करून ठेवला आहे. या प्रसंगानंतर युद्धातील पराक्रमामुळे कारगीलचे महत्व भारताला समजले. १९९९ साली झालेल्या घुसखोरीच्या युद्धातही आपल्या जवानांनी अफाट शौर्य दाखवून या खडतर क्षेत्राचे आपल्या जीवानिशी संरक्षण केले आहे, हे आपण विसरून कसे चालेल. कारगील युद्धातील आपल्या जवानांच्या बलिदानापुढे नतमस्तक होण्यासाठी एकदा तरी प्रत्येक सच्च्या भारतीयाने कारगीलला जायला हवे. इथली संघर्षमय परिस्थिती प्रत्यक्ष जाऊन अभ्यासल्याशिवाय, बघितल्याशिवाय आपले जवान किती कठीण परिस्थितीत पहारा देत व लढत देशसेवा करतात, हे लक्षात येत नाही.
याच भेटीमध्ये कुपवाडा येथेही जाणे झाले. रिचा फाउंडेशन भारतीय जवानांच्या सहकार्याने कुपवाडा येथे स्थानिक युवकांच्या आयुष्यात बदल घडवणव्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. त्यांच्या हुशारीला वाव देणे, त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि उदरनिर्वाहासाठी उपयोगात येणारी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. हे ओळखून निरनिराळ्या कंपन्या आपल्या CSR फंड्सच्या माध्यमातून इथल्या युवापिढीला जागृत करून येथे सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इथले तरुणही या प्रयत्नांना सहकार्य करत अनेक उपलब्ध विषयांमध्ये शिक्षण घेत आहेत. इथले तरुण अॅप्पल ज्यूस, जिंजर ज्यूस, अॅप्पल जॅम ऑरगॅनीक पद्धतीने व उत्तमरित्या बनवीत आहेत. या सर्व पायाभूत सुविधा भारतीय सैन्य आणि रिचा फाउंडेशनचे निखिल पंत यांच्या प्रयत्नातून निर्माण झाल्या आहेत. या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा म्हणून केसरीतर्फे रिचा फाउंडेशनसोबत व भारतीय सैन्य दलाच्या सहकार्याने कुपवाडा जिल्ह्यात टूरिझमच्या नव्या कोर्सचे उदघाटन करण्यात आले आहे. या वेळी सकारात्मक बदल आम्हाला जाणवला तो म्हणजे तरुणाईच्या हाताला काम हवे आहे आणि काम करायची त्यांची तयारी सुद्धा आहे. कुपवाडा हा काश्मिरमधील तसा दुर्लक्षित भाग असला तरी येथील निसर्ग सौंदर्यही अतिशय प्रेक्षणीय असून येथेही टूरिझमचे प्रचंड पोटेंशियल आहे. संधींची उपलब्धता कमी असल्याने इथल्या लोकांमध्ये याबाबत अद्याप फारशी जागृकता नाही. येणाऱ्या काही दिवसांत लोकल ट्रेन जेव्हा बारामुल्लापर्यंत पोहचेल तेव्हा इथले पर्यटन एक वेगळी उंची गाठणार हे तितकेच नक्की. रिचा फाउंडेशन आणि सैन्याच्या मदतीने इथली तरुणाई आता शिक्षणाची आणि व्यवसायाची स्वप्ने पाहू लागली आहेत, याचा आम्हाला आनंद आहे.
याच भेटीत माझे मोठे बंधू शैलेश पाटील यांनी अथक प्रयत्नाने जगप्रसिद्ध दल लेकच्या निसर्गरम्य परिसरात उभे केलेले हॉटेल लेक व्ह्यू काश्मीर पाहून खूप आनंद झाला. या वेळी या हॉटेल मधील बॉलिवूड करी या रेस्टोरंटमध्ये खमंग पदार्थांचा आस्वादही घेता आला. तसेच याच भेटीत काश्मीर मधील व्यावसायिक संबंध असलेले मात्र कालांतराने कौटुंबिक संबंध जोडले गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाच्या पारंपरिक काश्मिरी पद्धतीच्या लग्नालाही धावत पळत भेट दिली.
केसरी परिवारासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या काश्मीर येथील या दोनही उपक्रमांमुळे या वर्षीचा वाढदिवस सुखद व संस्मरणीय ठरला. धन्यवाद मंडळी, आमच्या आनंदात आपणही सहभागी व्हा. मस्त फिरा. ताजेतवाने व्हा केसरीसोबत !
केसरी अॅकॅडमी – पर्यटन क्षेत्रात सुवर्णसंधी!
मंडळी, केसरी अॅकॅडमी पुन्हा सुरु करत आहोत. जर आपल्या संपर्कातील कोणालाही पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करायचा असेल तर अधिक माहितीसाठी आपण ७७९६००६५४५ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान संपर्क साधू शकता.