विविधतेने नटलेला जपान

एक अविस्मरणीय अनुभव…!

युरोप खंडात सहलीला जाताना बऱ्याचदा संभ्रम होतो. संपूर्ण युरोप बघायचा तर एकदाच युरोप प्रवास करून चालणार नाही, अनेकदा युरोपला जावे लागते. वेस्टर्न युरोप, नॉर्दन युरोप, स्कँडिनेव्हिया, सेंट्रल युरोप, ख्रिसमस मधला युरोप, बर्फाच्छादित युरोप, क्रूज सफरसह युरोप, युरेशियन देश, फ्रेंच रिव्हेरा, नॉर्दन लाइट्स, मिडनाईट सन, वगैरे सारे पाहायचे तर निदान दहा-बारा वेळा तरी युरोप प्रवास करावा लागेल. भारतीय पर्यटकांना मात्र युरोपचे इतके आकर्षण आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात युरोप प्रवास केला आहे. असा वेगवेगळ्या तऱ्हेचा युरोप पाहण्यासाठी भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने युरोपवारी करताहेत.

जगात असेही काही देश आहेत, जिथे सगळी महत्त्वाची पर्यटन स्थळे आपण एका भेटीत पाहू शकतो. अशा ठिकाणी नक्की केव्हा जायचे ते प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार ठरवायला हवे. आता जपानचे उदाहरण घ्या. चेरी ब्लॉसमचा जपान म्हणजे अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अविष्कारच संपूर्ण जपान जणू निसर्गदेवतेने स्वतः आपल्या हाताने सजवलाय असेच वाटते. एका वेगळ्याच उत्सवाचे स्वरूप या काळात जपान देश आणि जपानी लोकांच्या उत्साहाला लाभलेले असते. चेरी ब्लॉसमचा निसर्ग उत्सव मर्यादित काळापुरता असून साधारणपणे मार्च अखेर ते एप्रिल पहिला आठवडा या काळात आपण अनुभवू शकतो. इट इज ऑन मदर नेचर. एक ते दोन आठवडे आपल्याला कुठे ना कुठे तरी चेरी ब्लॉसम पाहता येतो. आपण जर या काळात जपानला जाऊ शकलो नाही, तर पुढे मे महिन्यात आशिकागा फ्लॉवर फेस्टिवल दरम्यान जपान पाहण्यासारखा असतो. असंख्य फुलांनी बहरलेले बगीचे (विस्टेरिया) पाहिले म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटते. या जपानचे रूपही लोकांना प्रचंड आनंद देऊन आल्हाददायक करते. पुढे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फॉल कलरचा जपान पाहणे हाही एक अविस्मरणीय अनुभवच… फॉल कलर्स जपानच्या काही भागात फारच सुंदर दिसतात. बर्फाच्छादित जपान हा सर्व स्कीइंग करणाऱ्या पर्यटकांना जास्त आकर्षित करतो. म्हणजेच आपण वर्षभर वेगवेगळ्या सौंदर्याने नटलेला जपान अनुभवू शकतो.

जपानमध्ये फक्त पर्यटन स्थळेच बघावीत असे नाही तर तिथली संस्कृती, परंपरा, लोककला, राहणीमान, त्यांचे सतत कार्यमग्न असणे व मिनिटामिनिटांचा हिशोब ठेवणे आणि अतिशय वेगाने व डॉट टाईम चालणाऱ्या ट्रेन्स हे सारे पाहणे, अनुभवणे खरोखरच खूप सुखावह आहे. स्टेशनवर आपण उभे असू तर फोटो टिपण्याआधी बुलेट ट्रेन आपल्या समोरून निघून जाते. माझ्या जपान दौऱ्यात मी एका भारतीय रेस्टोरंट चालकाला विचारले, “कितने साल आप यहाँ हो? कैसे हो ?” तर म्हणाला, “हम यहाँ बहुत खुश हैं, यहाँ सभी लोग शांति और सलीकेसे रहते हैं, कोई किसी के ऊपर चिल्लाता कभी – कभी नहीं, और हमें यहाँ रहना बहुत पसंद है।” या देशाबद्दल देशाभिमान हा फक्त इथल्या नागरिकांमध्येच नाही तर बाहेरून इथे स्थायिक झालेल्या लोकांमध्येही आहे. जपानमध्ये फिरताना किमोनो घालून बाहुलीसारख्या सुंदर दिसणाऱ्या मुली पाहिल्या की भारतीय महिलांनाही किमोनो घालून फोटो काढावासा वाटला नाही तर नवलच. सायोनारा – सायोनारा या गाण्यामधली आशा पारेखची वेशभूषा आजही प्रत्येकाच्या मनात ठसलेली आहे.

जपानची भाषा, तिथले प्रचंड आदरातिथ्यशील लोक, त्यांचे सदैव समोरच्या व्यक्तीला आदर देणे, कामात सतत व्यग्र असणे हे सारे खूप वेगळे आहे. इथली स्वच्छता तर अगदी वाखाणण्यासारखी आहे, म्हणून जपान आपल्याला नेहमी आकर्षित करतो. छोटी-छोटी घरे, छोटी हॉटेल्स, छोट्या रूम्स, हेही इथले एक आकर्षणच आहे. तर मंडळी, उगवत्या सूर्याचा हा देश जगातील काही अत्यंत सुप्रसिद्ध देशांपैकी एक आहे. सगळ्यात जास्त लाईफ एक्सपेक्टन्सी रेटमुळे १०० वर्षांवरील बरीच मंडळी इथे आनंदाने जगत आहेत. आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते ‘जीवन यांना कळले हो’.

चला तर मग मंडळी, आपण हे सारे जपानला जाऊनच अनुभवुया.

Tags