Feel Kesari. Live Kesari.

१९८४ साली केसरी भाऊंनी ( वडिलांनी) केसरी टूर्सची सुरुवात वयाच्या पन्नासाव्या वर्षी केली. भारतीयांना भारत उत्तमरीतीने दाखवायचा, जगभरातील पर्यटकांना भारत आणि भारतीयांना जग दाखवायचे, असं भाऊंचं मोठं स्वप्न. प्रामाणिकपणे पर्यटनातून आनंद घ्यायला शिकवणे, तिथला इतिहास, भूगोल आणि संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून द्यायची, दिलेलं वाचन पूर्ण करायचं व पर्यटनातून अविस्मरणीय अनुभव द्यायचा, या प्रयत्नांतून केसरीची निर्मिती झाली. हाताशी पैसा नसताना केवळ आत्मविश्वास आणि ज्ञानाच्या जोरावर भाऊंचा हा प्रवास सुरू झाला. या प्रवासात भाऊंना आईने खंबीरपणे साथ दिली, आणि भाऊंची पुढची पिढी म्हणजे आम्ही चार भावंडांनी हा व्यवसाय पुढे नेण्याचं आणि भाऊंचं स्वप्न मोठं करण्याचं आव्हान स्वीकारलं.

चार-पाच वर्षांतच भारतीय टूर्सना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. नव्वदच्या दशकात स्वतः मालक टूर्सवर अशी मानसिकता असताना केसरीने मात्र टूर लिडर्सची एक फौज निर्माण करायला सुरुवात केली आणि व्यवसायाला बळ मिळाले. हनिमूनला कोण टूर्सना जाणार असं म्हणता म्हणता केसरीच्या हनिमून टूर्स यशस्वी होऊ लागल्या. आज कॉर्पोरेट टूर्स MICE म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु, केसरी दोनशे ते अडीचशे लोकांचे मोठे ग्रुप्स काश्मीरमध्ये नव्वदच्या दशकात नेत होते. केसरीच्या भारतातील टूर्स पर्यटकांना आनंद देत होत्या, तोच पॅटर्न परदेशातील टूर्सना द्यायचं ठरवलं आणि ‘ऑल ऑप्शनल’च्या जमान्यात ‘ऑल इन्क्लुसिव्ह टूर्स’ करू लागलो. साउथ ईस्ट एशिया आणि युरोपमध्ये तर पर्यटकांनीच या यशाचं प्रमाणपत्र केसरीला दिलं. आपण व्यवसायात प्रामाणिकपणे खटाटोप करतो, ह्याला आपल्या ग्राहकांनी दाद दिली तर त्यासारखं दुसरं समाधान नाही. केसरीच्या ऑल इन्क्लुसिव्ह फॉरेन टूर्सना पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता हा ट्रेंड सेट झाला आहे.

नाविन्य किंवा इनोवेशन हा कुठल्याही व्यवसायाचा गाभा आहे आणि दुसऱ्या पिढीने त्यावर भर दिला. केसरीच्या ‘माय फेअर लेडी’ च्या फक्त महिलांसाठीच्या टूर्स जगप्रसिद्ध झाल्या. सीनियर सिटीजनच्या टूर्स सुरू केल्या आणि आता तो एक प्रघातच झाला आहे. पुढे मारीगोल्ड रीलिजिअस टूर्स, ऍग्रो टूर्स फॉर फार्मर्स, नासा टूर्स शाळकरी मुलांसाठी, युथ टूर्स, कॉर्पोरेट टूर्स, MICE म्हणजेच इन्सेंटिव्ह टूर्स जिथे दहा लोकांपासून ते तीन ते चार हजार लोकांपर्यंतच्या टूर्स आपण करतोय. केसरी वेडिंग्समध्ये आपण डेस्टिनेशन वेडिंग्सची सर्व तयारी, मार्गदर्शन आणि अंमलबजावणी करतोय. ‘केसरी स्ट्रॉबेरी’ या विभागांतर्गत आपण इंडिविज्युअल पर्यटकांच्या गरजा, एक्सपेरिमेंटल ट्रॅव्हल, कुठली स्थळे, हॉटेल्स उत्तम आहेत, काय बघायलाच हवे ते सारे मार्गदर्शन करतोय.

चाळीस वर्षांच्या केसरीच्या या प्रवासात पर्यटकांचं प्रेम आणि आशीर्वाद लाभले ही आमची सर्वात मोठी जमापुंजी. पर्यटकच आमचे ब्रँड म्बेसिडर बनले आणि केसरी घराघरात पोहोचलं. आज भारतीय पर्यटकाला आणि पर्यटनाला ग्लॅमर मिळाले आहे. बऱ्याच परदेशी संस्था किंवा देश भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, यात कुठे तरी खारीचा वाटा केसरीने उचलला आहे, योगदान दिले आहे, याचा अभिमान वाटतो.

केसरीची तिसरी पिढी म्हणजे माझा मुलगा अर्जुन चौबळ, केसरीची कमर्शियल, कॉन्ट्रॅक्टींग आणि नेटवर्किंगची धुरा सांभाळतोय. तो सुद्धा केसरीभाऊंच्या म्हणजेच आजोबांच्या शाळेत ‘पर्यटक देवो भवः’ हे शिकला आहे आणि त्याच मार्गाने तो केसरी पुढे नेईल, असा आज श्वास वाटतो.

केसरीच्या या प्रवासात ज्या ज्या व्यक्तींचे, संस्थांचे योगदान आहे, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. आमचे देवासमान पर्यटक, सर्व कर्मचारी वर्ग ज्यांच्याशिवाय हे शक्य नाही, टूर लिडर्स म्हणजेच केसरीच आपलं माणूस (मुलापेक्षा जास्त काळजी घेतली हा आमचा नेहमीचा फीडबॅक) सप्लायर्स, हॉटेलिअर्स, एअरलाइन्स, टुरिझम बोर्ड, कॉन्स्युलेट्स सर्वांना खूप खूप धन्यवाद !

पर्यटनाच्या दृष्टीने आपला भारत बदलतोय, इन्फ्रास्ट्रक्चर बदलते. येणाऱ्या काळात भरपूर परदेशी पर्यटकांना भारत दाखवायचा आहे, हे स्वप्न उराशी बाळगून आहोत. खूप सारी पर्यटन सर्किट्स भारतात तयार होत आहेत. परदेशी पर्यटकांना भारत नक्कीच आवडणार कारण आपण वेगळे आहोत आणि हे वेगळेपण हीच येणाऱ्या काळात आपली शक्ती असेल.

Tags