आमची वाटिका!


“आर्यन, बघ आपल्या घरातून कसा समुद्र दिसतो. आमच्या मुंबईत समुद्र आहे, तुमच्या पुण्यात असं काही आहे का?” भाऊंना म्हणजे आमच्या वडिलांना आर्यनला गमतीनं असे प्रश्न विचारायला, चिडवायला आवडायचं. आर्यनही मोठ्या हुशारीनं आपल्या आजोबांना चटपटीत उत्तरं दयायचा. “आमच्याकडे वाटिका आहे.” ४ वर्षाच्या माझ्या आर्यनने उत्तर दिलं. छोट्या आणि हजरजबाबी आर्यनचं हे उत्तर बाबांना खुप आवडलं. पुण्यात घर शोधत असताना आम्हाला मॉडल कॉलनीतली ही वाटिका भावली. गेली २० वर्षे आम्ही इथे राहत आहोत आणि ही वाटिका म्हणजे इथल्या रहिवाशांची जीवनदायीनी आहे. आठव्या माळ्यावरून आम्हाला या वाटिकेचा सुंदर नजारा दिसतो. मे महिन्यात बहरलेला गुलमोहर अविस्मरणीय वाटतो. या वाटिकेमुळे आमच्या घराचं सौंदर्य आणि इथल्या राहिवाशांचं जीवनमान कैक पटीने वाढलं. 

मॉडेल कॉलनीतील ही वाटिका म्हणजे केवळ एक उद्यान नाही, तर आम्हां सर्वांसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी केंद्र आहे. इथे लोक सकाळी चालतात, हास्य-व्यायाम करतात, व्यायाम साधनांचा सराव करतात आणि इथे योग प्रशिक्षणही होते. दिवाळी पहाटेला सुमधुर गाणी ऐकण्याचा अनुभवही मिळतो. पक्ष्यांचा चिवचिवाट, रंगीबेरंगी फुलं, आणि गुलमोहरचं सौंदर्य यामुळे वाटिका अधिक सजीव वाटते.

या वाटिकेने मला चालण्याची सवय लावली आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला. जगभर सुंदर ठिकाणं पाहिली तरी, या वाटिकेचं माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. ही वाटिका म्हणजे माझ्या जीवनाचा आज एक अविभाज्य भाग बनला आहे. जगभरातील अशा सुंदर बागा मला भुरळ घालतात. मला वारंवार तिथे जावंसं वाटतं. आपल्या अवतीभवती अशा बागा असायलाच हव्या आणि आपण त्या बघायलाच हव्या.

उगवत्या सूर्याच्या देश म्हणजे जपान हा प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगांनी सजतो. इवल्या इवल्या पांढऱ्या – गुलाबी चेरी ब्लॉसम फुलांनी न्हाऊन निघाला की जगभरातील पर्यटकांची पावलं आपोआपच जपानकडे वळतात. चेरी ब्लॉसमचा सुंदर देखावा आणि मुक्तपणे फिरणारी हजारो हरणं यासाठी नारा डिअर पार्क नावाची भव्य बाग प्रसिद्ध आहे. तसंच ही बाग अनेक ऐतिहासिक आणि धार्मिकस्थळांनी वेढलेली आहे. आराशियामा बांबू ग्रोव्ह ही जपानमधील नैसर्गिक सौंदर्याने नटलेली अनोखी बाग. इथली उंच बांबूची झाडे आकाशापर्यंत पोहोचल्यासारखी भासतात. इथल्या शांत मार्गिकेतून चालताना झाडांच्या दाट छत्राखालून येणारा सूर्यप्रकाश आणि पानांचा सौम्य सळसळणारा आवाज एक अद्भुत अनुभव देतो. निसर्गप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी अशीच ही जागा. तर दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत अशिकागा पार्कमध्ये साजरा होणाऱ्या फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये गुलाबी, जांभळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या विस्टेरिया फुलांच्या सौंदर्य अनुभवता येते. इथलं 150 वर्षे जुनं विशाल विस्टेरिया झाड, त्याच्या फुलांनी तयार झालेलं आच्छादन नेत्रदीपक दिसतो. रात्रीच्या वेळेस प्रकाशझोतात या फुलांचे दृश्य मनमोहक वातावरण तयार करते. हा फेस्टिव्हल जपानच्या वसंत ऋतूतील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.

दुबईमधलं मिरॅकल गार्डन हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक फुलांचा बगीचा आहे. 72 हजार चौरस मीटर क्षेत्रावर 150 दशलक्षांहून अधिक फुले विविध सुंदर आकृत्यांमध्ये सजवलेली आहेत. हृदयाच्या आकाराचे आर्चेस, फुलांचे किल्ले, फुलांनी सजवलेले एअरबस ए380, इथली हिवाळी प्रदर्शनं आणि बटरफ्लाय गार्डन पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. निसर्ग आणि कला प्रेमींसाठी ही बाग एक अद्वितीय अनुभव देते.

सिंगापूरची गार्डन्स बाय द बे म्हणजे 101 हेक्टर क्षेत्रावर पसरलेली अद्वितीय बाग. सौर उर्जेवरील इथले भव्य सुपरट्री ग्रोव्ह, जगातील सर्वात मोठा काचेचा हरितगृह फ्लॉवर डोम, क्लाउड फॉरेस्ट या सारख्या अनेक अविष्कारांमुळे हे ठिकाण निसर्ग, कला, आणि तंत्रज्ञान यांचा उत्तम मिलाप ठरते. 

थायलँडमध्ये नॉन्ग नूच व्हिलेज नावाचा 500 एकरांवर पसरलेला उष्णकटिबंधीय बगीचा आणि सांस्कृतिक केंद्र आहे. फ्रेंच, युरोपियन, आणि पारंपरिक थाई बागांचे विविध प्रकार, कॅक्टस आणि सुक्युलंट्स गार्डन, ऑर्किड नर्सरी, आणि बोनसाय झाडे असं बरंच काही इथे पाहता येतं. पारंपरिक थाई नृत्य, मार्शल आर्ट्स, आणि हत्तींच्या शो असे सांस्कृतिक कार्यक्रम इथे दररोज होतात. सायकलिंग, बोटिंग, आणि मिनी झू व्हिझिट यांसारख्या ऍक्टिव्हिटीजही पर्यटकांना करता येतात. निसर्ग, संस्कृती, आणि मनोरंजन यांचा उत्तम संगम असलेलं नॉन्ग नूच व्हिलेज सर्व वयोगटांतील पर्यटकांसाठी आकर्षण ठरते.

भारतातील विविध राज्यकर्त्यांनी आपल्या काळात अप्रतिम बागांची निर्मिती केली, ज्या आजही त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये काश्मीरमधील श्रीनगरच्या शालिमार बाग आणि निशत बाग यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांना या रमणीय मुघल बागांचे मनोहारी दृश्य अनुभवता येतं. विशेषतः ट्युलिप्स फुलांच्या हंगामात काश्मीर आणि नेदरलँड्सचा रंगीत देखावा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. या देखावा पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक दाखल होतात.

केरळला गेला आणि तिथल्या हिरव्यागार टी गार्डनला भेट दिली नाही, असा व्यक्ती सापडणं थोडं अवघडच. केसराच्या फुलांचा हंगाम सुरू झाला की श्रीनगरहून अवंतिपुरा जाताना पंपोरमधील गर्द जांभळ्या फुलांनी सजलेल्या शेतांवरून सहज लक्षात येतं. या मोहक देखाव्यात फोटो काढणं, केसर उत्पादनाविषयी माहिती मिळवणं, आणि अस्सल केसर खरेदी करणं, ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच. राजस्थानच्या भेटीत आमेर किल्ल्यासमोरील केसर क्यारी आणि उदयपूरमधील सहेलियो की बारी या निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अद्वितीय बागांना भेट देत त्यांचं ऐतिहासिक महत्त्व समजून घेता येतं. भारतातील या ऐतिहासिक बागांनी सभोवतालच्या प्रदेशाच्या सौंदर्यात भर घातली आणि या बागा त्यांच्या स्थापत्यकौशल्याचा आणि प्राचीन परंपरांचा गौरवशाली इतिहासही सांगतात. देशविदेशातील पर्यटकांसाठी या बागा नेहमीच प्रेरणादायी आणि आनंददायक ठरतात.

जगभरातील प्रत्येक बागेचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ज्यात आनंद आणि अनुभवाची अनोखी छटा दडलेली आहे. म्हणूनच या बागांचं अप्रतिम सौंदर्य नेहमीच आपल्या आठवणीत राहतं. चला तर मग, यंदा कुठली बाग पाहायला जायचं देशातली की परदेशातली? हे पटापट ठरवा. मला खात्री आहे की आपण नक्कीच या बागांच्या प्रेमात पडाल.

Tags