ऐतिहासिक सौंदर्याचा वारसा ! – सेंट्रल युरोप भाग एक

सेंट्रल युरोप – इथलं निसर्गसौंदर्य, इतिहास, लढाया, राजवाडे, त्यांचा हास आणि पुन्हा उभारी… या सगळ्यांचा प्रवास म्हणजे सेंट्रल युरोप. यामध्ये पोलँड, जर्मनी, झेक रिपब्लिक, स्लोव्हेनिया आणि हंगेरीसह अनेक युरोपियन देश येतात. काही देशांनी युरोपियन युनियनसोबत युरो हे चलन स्विकारलंय, तर काही देश म्हणजे हंगेरी, पोलँड, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, फ्लोरिंट, पोलिश झ्लॉटी, स्लोव्हेनियन टोलर, क्रोएशियन कुना आणि झेक कोरुना असे वेगवेगळे चलन इथे आहेत. थोड्याफार फरकांनी युरो चलनाच्या 25 टक्के या चलनांची किंमत आहे. 

केसरीच्या नुकत्याच गेलेल्या सेंट्रल युरोप टूरमधील सर्वच मंडळींनी या आधी वेस्टर्न युरोपची टूर केलेली आणि म्हणूनच सेंट्रल युरोपियन देशांची सफर करताना इथलं वेगळेपण सर्वांनाच जाणवलं आणि भावलंही ! या टूरमध्ये आम्ही सेंट्रल युरोपच्या अतिशय सुंदर पण रहस्यमय इतिहास असलेल्या शहरांना भेट दिली. रिपब्लिक ऑफ पोलँडने टूरच्या प्रवासाला सुरूवात होते. क्रॅक्रॉव्ह हे पोलँडमधील ऐतिहासिक महत्त्वाचं शहर. नाझींच्या हिंसाचाराच्या खुणा इथल्या ऑशविट्स कॉनसन्ट्रेशन कॅम्पमध्ये पाहता येतात. या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटला भेट दिली तेव्हा इथला इतिहास ऐकताना आम्ही हतबल झालो, कारण इथल्या अमानुष छळाने मानवी अत्याचारांची परिसीमाच गाठली होती. “म्या मरण पाहिलं माझ्या डोळा !” अशी अवस्था इथल्या प्रत्येक ज्यू समाजाच्या लोकांची झाली होती. कारण ते रोज हे सगळं बघत होते आणि त्यांनाही माहित होतं की आपल्यासाठी पुढे काय वाढून ठेवलंय. मारलेल्या लोकांच्या शरीरांचे अवयव, केस आणि कपडे यांचाही व्यवसाय होत असे. हे ऐकून आम्ही सगळे स्तब्ध झालो. भारतीयांनीही असे अनेक अत्याचार आणि यातना सहन केल्या आहेत. असो… इतिहास हा आपल्याला शिकण्यासाठीच आणि सत्य कितीही कटू असलं तरी त्याकडे डोळसपणे पाहण्यासाठी असतो. 

मग पोलँडची राजधानी वॉसमध्ये आपण पोहचतो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वॉस मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालेलं, पण ते पुन्हा उभं राहिलं….. जणू राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षीच ! पोलँड देशाच्या नॉर्थला बाल्टीक सी आहे तर साऊथला सुडेट्स आणि कार्पेथियन माऊंटन्स् आहेत. या देशाला लिथुआनिया, रशिया, बेलारूस, युक्रेन आणि झेक रिपब्लिक या देशांनी वेढलंय. वॉस आणि क्रॅकॉव्ह या शहरांनी अनेक परकीय आक्रमणं झेलली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत फार मोठी हानी झाली, पण इथल्या वास्तू पूर्वी जशा होत्या त्याप्रमाणे कालांतराने त्यांची पुनर्निर्मिती करण्यात आली. ज्यामध्ये द रॉयल कॅसल इन वॉर्सा, ओल्ड टाऊन आणि मॉडर्न टाऊनसह अनेक स्थळांचा समावेश आहे. या शहरांतून वल्टावा नदी वाहते. 

या टूरमध्ये इथल्या गगनचुंबी इमारती, त्यांची स्थापत्यशैली आणि ऐतिहासिक स्मारकेसुद्धा पाहतो. इथला मार्केट स्क्वेअर आणि घोड्यांच्या बग्गी हे पाहताना परिकथेतील शहरांसारखं वाटतं. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट व्हेलिश्का सॉल्ट माईनची भेट इथलं मुख्य आकर्षण आहे. पुढे आपण जर्मनीमधील बर्लिन शहरात पोहचतो. पोलँडच्या मानाने खूप मोठ्या असलेल्या या देशात येताच आपल्याला इथली वैभवसंपन्नता जाणवते. 1989 मध्ये ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनीतील ऐतिहासिक बर्लिन वॉल पाडली. इथे आपण वॉल मोन्युमेंट, बर्लिन वॉल पॉईंट आणि बर्लिन डोम कॅथेड्रल तसंच या शहराचा सुंदर नजारा पाहतो. गॉडस् व्हिक्ट्री स्टॅच्यू अॅडमिनीस्ट्रेटिव्ह आणि कॅपिटल बिल्डींग्स, न्यू बर्लिन, ओपेरा हाऊस आणि बर्लिन टॉवरला भेट देतो. बर्लिनवरून आपण ड्रेस्डेनला जातो. कोणतंही शहर बसमधून बघण्यापेक्षा आपण पायी चालून पाहिलं, तर त्या शहराची खरी सुंदरता अनुभवता येते. असाच काहीसा अनुभव आम्हाला ही शहरं फिरताना आला. ड्रेस्डेनची पायी टूर करून सिटी ऑफ हंड्रेड स्पायर्स आणि अनेक बॉलिवूड, हॉलिवूड सिनेमांचं शूटिंग झालेल्या अतिशय देखण्या प्रागमध्ये येतो. झेक रिपब्लिकचं पॉलिटिकल कल्चरल आणि इकॉनॉमिक हब असं ज्याचं वर्णन केलं जातं ते म्हणजे प्राग! या शहराची मजा आपण पायी चालून घेतो आणि वल्टावा नदीवर सुंदर क्रूझ सफरही करतो. जगातील सर्वात मोठा प्राग कॅसल, माद्रिदमधील रॉयल पॅलेस, -हादकेनी कॅसल, गोल्डन लेनमध्ये 16 व्या शतकात रुडॉल्फ दुसरे यांचे कॅसल पाहतो. इथे गार्ड्स रहायचे, पुढे 17 व्या शतकात गोल्डस्मिथ राहू लागले. म्हणूनच त्याला गोल्डन लेन म्हणतात. 1950 साली ही घरे वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवली आणि हा एक कायमचा लँडमार्क झाला. सेंट विट्स कॅथेड्रल ही आवर्जून पाहण्यासारखी जागा आहे, जी त्याची स्थापत्यशैली आणि स्टेनलेस ग्लास पेंटींगसाठी प्रसिद्ध आहे. ओल्ड टाऊन स्क्वेअर हब, शॉपिंग आणि अॅस्ट्रॉनॉमिकल क्लॉकसह अशी अनेक आकर्षणं आहेत. यानंतर आपण प्रागमध्ये बांधलेला चार्ल्स ब्रीज पहायला जातो, इथला नजारा पहाताना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.

या ब्रीजच्या नॉर्थ साईडला सेंट जॉन ऑफ नेपोमूक यांचा पुतळा आहे. इथल्या स्थानिकांची अशी मान्यता आहे की, सेंट जॉन ऑफ नेपोमूक किंवा स्मॉल क्रॉस किंवा या पुतळ्यावरील कुत्र्याला जर स्पर्श केला तर आपल्याला गुडलक येतं. प्रदुषणामुळे हा पुतळा काळा झाला आहे, मात्र स्पर्श करून करून हा कुत्रा गोल्डन झाला आहे. (फक्त भारतीयच नाही, तर सगळं जग गुडलकपाठी धावतं बरं का ? ). हे बघून झाल्यावर आपण परत प्रागला येतो. 

इथे भेट देणं म्हणजे इतिहासाच्या पावलांवर पाऊल टाकत एक अविस्मरणीय अनुभव घेणं आहे. या बद्दल अजून जाणून घेऊयात पुढच्या भागात ! (क्रमश:)

Tags