हिमालय यात्रांसाठी महत्त्वाच्या सूचना!

हिमालयातील Chardham, Kailash Mansarovar आणि Amarnath यात्रांचा सीझन सुरू झाला आहे. अनेक भाविक मोठ्या उत्साहाने चारधाम यात्रेला निघाले आहेत. काही जण दर्शन घेऊन समाधानाने परतले आहेत, तर अनेक जण कैलास मानसरोवर आणि अमरनाथ यात्रेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहेत. या यात्रांचा काळ सुरू होणं म्हणजे हिमालयाशी पुन्हा एकदा नव्यानं जोडलं जाण्याचा एक विलक्षण अनुभव! उन्हाळ्याची चाहूल लागताच हिमालय हळूहळू नव्या रूपात खुलू लागतो. बर्फ वितळतो, रस्ते मोकळे होतात आणि निसर्ग पुन्हा एकदा भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हवामान, निसर्ग आणि प्रवासाची परिस्थिती लक्षात घेऊन या यात्रांचे कालावधी निश्चित केले असावेत. त्यामागे श्रद्धेसोबत अनुभव, दूरदृष्टी आणि निसर्गाशी असलेलं नातंही दडलेलं आहे.

अशा या श्रद्धा, निसर्ग आणि आव्हानांनी भरलेल्या यात्रेला निघण्यापूर्वी अनेक भाविकांच्या मनात एक प्रश्न अगदी स्वाभाविकपणे येतो  “या यात्रा आम्हाला नीट पूर्ण करता येतील ना?” आणि आमचं उत्तर नेहमी एकच असतं “हो… नक्कीच!”, पण त्यासाठी योग्य शारीरिक आणि मानसिक तयारी, सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची असते. श्रद्धा आपल्याला पुढे चालण्याची ताकद देतेच, पण योग्य तयारी हा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी बनवते. 

यासाठी या यात्रांना आपल्यासोबत वर्षानुवर्षे या यात्रा करणारे अनुभवी टूर लीडर्स असतात. त्यांनी हजारो यात्रेकरूंना या पवित्र यात्रांचा अविस्मरणीय अनुभव दिला आहे. प्रत्येक यात्रेकरूंचे अनुभव, त्यांना आलेली आव्हानं, प्रवासातील अडचणी, त्यांची तयारी आणि दर्शनानंतर मिळालेलं समाधान… हे सगळं त्यांनी अगदी जवळून अनुभवलं आहे. त्यांच्या याच अनुभवांच्या शिदोरीतून, त्यांच्याकडून ऐकलेल्या अनेक गोष्टींतून आणि स्वतः अनेक यात्रा करताना आलेल्या अनुभवांतून हा लेखप्रपंच करत आहे. कारण आपण या यात्रा पूर्ण करून परतताना, “यात्रा खूप सुंदर झाली!” असं समाधानाने सांगता, तेव्हा त्याचा आनंद आमच्यासाठीही तितकाच खास आणि समाधान देणारा असतो.

या यात्रा देवदर्शनासह तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत अनुभवलेला एक वेगळाच प्रवास असतो. बदलणारं हवामान, उंच प्रदेश, कमी ऑक्सिजन, लांबचा प्रवास, डोंगररस्ते, ट्रेक आणि काही वेळा सलग अनेक तासांचा प्रवास या सगळ्याशी शरीर आणि मन दोन्ही जुळवून घ्यावं लागतं. अलीकडच्या काळात रस्ते, हॉटेल्स, टेंट स्टे, गेस्ट हाऊस आणि इतर अनेक सोयीसुविधा पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या झाल्या आहेत. डोली, घोडे आणि शेर्पा टीम यांसारख्या सुविधांमुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे. मात्र, योग्य तयारी नसेल तर या यात्रांमध्ये अडचणी जाणवू शकतात. म्हणूनच यात्रेला निघण्यापूर्वी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग, हिमालय यात्रा अधिक सुखकर, सुरक्षित आणि संस्मरणीय बनवणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. 

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधामांची कपाटं उघडतात, तर भाऊबीजेदरम्यान बंद होतात. साधारणपणे एप्रिल ते ऑक्टोबर हा यात्रेचा कालावधी असतो. जुलै-ऑगस्ट महिन्यांत मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची शक्यता वाढते. तसेच हवामानातील सततचे बदल लक्षात घेता, काही वेळा सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा तात्पुरती स्थगित करावी लागू शकते.

ही यात्रा साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली जाते. अमरनाथ गुहेमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारं बर्फाचं स्वयंभू शिवलिंग पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक या यात्रेला येतात. गुहेच्या वरच्या भागातील बर्फ वितळल्यानंतर त्यातून झिरपणारं पाणी थेंबांच्या स्वरूपात गुहेमध्ये खाली येतं. अत्यंत कमी तापमानामुळे हे थेंब हळूहळू गोठत जातात आणि त्यातून नैसर्गिकरीत्या बर्फाचं शिवलिंग तयार होतं. अमरनाथ यात्रेत हेलिकॉप्टर सेवा पंचतरणीपर्यंत उपलब्ध असते. त्यानंतर काही अंतर ट्रेकिंग करावं लागतं. तसेच इच्छेनुसार डोली, घोडा किंवा हेलिकॉप्टर सुविधेचाही लाभ घेता येतो.

साधारणपणे मे ते सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा आयोजित केली जाते. हवामानातील सततच्या बदलांमुळे यात्रेदरम्यान थंडी, वारा, कमी ऑक्सिजन आणि थकवा जाणवू शकतो. आमच्या यात्रेत वाहनांचा प्रवास दार्चेनपर्यंत असतो. त्यानंतर कैलास परिक्रमेकरिता तीन दिवस पदभ्रमण करावं लागतं. परिक्रमेकरिता घोडा किंवा पोर्टरची सुविधा उपलब्ध असते. तसेच, परिक्रमेच्या वेळी सामान उचलण्यासाठी शेर्पाची सशुल्क सेवा घेणं अधिक सोयीचं ठरतं. घोड्यावरून प्रवास करताना पाठीवर जड सॅक घेणं टाळावं. अपघाताने पडल्यास त्याचा त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे छोट्या सॅकमध्ये पाण्याची बाटली, औषधं, टॉर्च, बिस्किटं आणि चॉकलेट्स यांसारख्या आवश्यक वस्तू ठेवाव्यात.

* यात्रेच्या किमान दोन ते तीन महिने आधी तयारी करावी 

* नियमित स्ट्रेचिंग आणि मॉर्निंग वॉक 

* सुरुवातीला 2-3 किमी चालण्याचा सराव करा

* नंतर हळूहळू 5-6 किमीपर्यंत अंतर वाढवा

* शक्य असल्यास चढावावर चालण्याचा सराव करा

* जिने चढण्याचा सराव उपयुक्त ठरतो

* उंच प्रदेशात कमी ऑक्सिजनमध्ये श्वास सांभाळणं महत्त्वाचं असतं

* प्राणायाम, अनुलोम-विलोम आणि योगा करण्याचा सराव करा

* स्लो अँड स्टेडी हा सर्वोत्तम नियम आहे

* चालताना लहान पावलं टाका आणि श्वास नियंत्रित ठेवा

* शरीर रिलॅक्स ठेवा

* पाठीवर कमी वजनाची बॅग घ्या

* नवीन शूज थेट यात्रेत वापरू नका

* यात्रेपूर्वी शूज वापरून पायांना त्याची सवय लावा

* मानसिकदृष्ट्या शांत आणि सकारात्मक असणं महत्त्वाचं आहे

* काही वेळा हवामान, ट्रॅफिक किंवा परिस्थितीनुसार प्लॅनिंग बदलू शकतं; ते स्वीकारण्याची तयारी ठेवा

आहाराविषयी टिप्स

* हलका, पौष्टिक आणि गरम आहार घ्या

* भरपूर पाणी प्या

* प्रवासात शाकाहारी आणि सहज पचणारा आहार घ्या

* यात्रेपूर्वी पूर्ण हेल्थ चेकअप करून घ्या

* नियमित औषधं पुरेशा प्रमाणात सोबत ठेवा

* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बदलू नका

मंडळी, आपला प्रत्येक प्रवास आनंदमय, मंगलमय आणि सुरक्षित व्हावा, हीच आमची मनापासून इच्छा. मी स्वतःही अनेक हिमालय यात्रा केल्या आहेत आणि एक गोष्ट नक्की सांगू शकतो, तयारी चांगली असेल, तर यात्रा अधिक सुखकर, आनंददायी आणि संस्मरणीय होते!

Tags