केल्याने देशाटन…

२००१ साली आम्ही पुण्यात आलो, ही तेव्हाची गोष्ट, त्यावेळी बिझनेस टूरवर असताना मला एका ट्रॅव्हल एजंटने सल्ला दिला होता. “तुम्हाला पुण्याचे लोक माहीत नाहीत. ते ग्रुप टूरने फिरणार नाहीत. त्यातून तुम्ही पुण्यात ऑफीस विकत घेतलं, हे फार चुकीचं झालं. तुम्हाला कदाचित हे ऑफिस बंद करावं लागेल.” त्यांचं बोलणं मला आजही आठवतं परंतु पुण्यामध्ये अगदीच नवख्या असलेल्या मला त्यांच्या या बोलण्याची अजिबात भिती वाटली नाही, कारण मला माझ्या वडिलांवर आणि भावंडांवर विश्वास होता. मी जरी या व्यवसायात नवीन असले तरी त्यांच्या कामाची पद्धत आणि लोकांच्या आनंदी पर्यटनासाठी त्यांचं झटणं मला माहित होतं. आपला विश्वास ठाम ठेवला तर आपण आयुष्यात बरंच काही साध्य करू शक‌तो. दूसरे असे की आम्हाला लहानपणीच भाऊंनी शिकवण दिली होती की आपल्याला आयुष्यात दोन प्रकारची माणसे भेटतात. सकारात्मक लोक कसं वागावं आणि नकारात्मक लोक कसं वागू नये, हे शिकवतात. तेव्हापासून आजवर मी सतत नवनवीन व्यवसायिकांना प्रोत्साहित करत आले आहे. माणसे वाचून कसं वागावं, हे शिकण्याचा जणू छंदच लागला आहे. पर्यटन क्षेत्रात असल्याने आम्ही खूप वेगवेगळ्या माणसांना भेटतो आणि त्यांच्याकडून खूप शिकतो. आमच्या व्यवसायामुळे आम्हाला मिळालेलं हे वरदानच वाटतं जणू. 

या प्रसंगाची आठवण येण्याचं कारण मी नुकतीच आमच्या सुनीताताई जगताप यांना भेटायला गेले होते. मी पुण्यात नवीन होते तेव्हा ताईंनी मला खूप मदत केली होती. केसरी टूर्सवर त्यांचं खूप प्रेम. पुण्याहून मुंबईला जात त्या आपल्या सहलीचं बुकिंग करत. त्यांच्याच आग्रहाने केसरीचं पुण्यात ऑफीस सुरु झालं. उत्साहाचा झरा आणि प्रचंड कामाचा उरक असलेल्या या उत्साहमूर्ती ताईंना मी नेहमी म्हणायची, “मलासुद्धा म्हातारपणी आपल्यासारखं असं उत्साहात जगता आलं पाहिजे.” या ताई म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणास्रोतच. तसेच आमचे बागमार काका, डॉ. जाधव, पाटील काका आणि इतरांचा असा ८०-९० च्या वयातील तरुणांचा एक ग्रुप आहे. ते दरवर्षी केसरीची एक सहल न चुकता करतात. तरुणांनाही लाजवेल, असा उत्साह इथे असतो आणि जगण्यातला आनंद कसा घ्यावा हे यांना नक्कीच समजलं आहे. म्हणूनच ९० व्या वर्षी सुद्धा पाटील काका सहलीला जाण्याचा विचार करतात आणि सगळे मित्र एकत्र भेटून फिरायला जातात. देसाई ताई, बनारसे सर, कल्पनाताई जावडेकर, विश्वास आणि स्मिता महाजन. ज्योत्स्ना भाभी, रमण अंकल आणि अशा अनेक व्यक्ती या पर्यटनाच्या प्रवासात भेटल्या. इथे प्रत्येकाचं नावं लिहिणं शक्य नसलं तरी त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकता आलं. 

या प्रवासातील गमतीजमती म्हणजे सुंदर अनुभव. प्रवासाने नाती तर सुधारतातच, फॅमिली बॉण्डिंग होतं, आपल्या कुटुंबासाठी आपण खूप साऱ्या लाईफ टाईम मेमरीज बनवू शकतो. खास महिलांसाठीच्या आमच्या माय फेअर लेडी सहलीमध्ये अनेकींना आत्मविश्वासही मिळतो. एकटीला जमेल का? पासून सुरु झालेला तिचा प्रवास ६-७ दिवसांनंतर मी एकटी काहीही करू शकते इथपर्यंत पोचतो. “जर ती करू शकते तर मी का नाही ?” असं अनेक महिला म्हणतात. थायलँडच्या नाईट मार्केटमध्ये “ये कितने में दिया?” असं विचारल्यावर विक्रेता यांना कॅल्क्युलेटरवर किंमत मोजून सांगतो, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की फिरण्यासाठी भाषेची फार अडचण नाही. आमचे थायलँड मधील गाईड सुद्धा मराठी आणि हिंदी भाषा सहज बोलतात. आपल्या भारतीय पर्यटकांनी इतक्या मोठया संख्येने या प्रदेशात प्रवास केला की त्यांना या भाषा शिकाव्याच लागल्या. तीच अवस्था स्वित्झर्लंडची. तिथे भारतीय आदरातिथ्य शिकवलं जातं. पॅनडेमिकनंतर परदेशातील लोकसुद्धा आम्हाला भेटल्यावर नमस्ते म्हणतात. मलाही हॅन्डशेकपेक्षा नमस्ते म्हणणंच जास्त भावतं. चांगलं ते नक्कीच घ्यावं. आपलं नमस्ते खरं तर संपूर्ण जगाने अंगीकृत करायला हवं.

प्रवासात आपण फक्त्त पर्यटकांकडूनच शिकतो, असं नाही तर या देशांतील विविध संस्कृती, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवत असतात. जपान हा देश संयम, शांती, शिस्त आणि आदर शिकवितो तर चीन लाऊड वाटतो. शिवाय इथल्या वातावरणात एक प्रकारचं दडपण वाटतं. कारण त्यांना त्यांचा इतिहास सांगण्याची, सरकारविषयी खुलेपणानं बोलण्याचीही मुभा नाही. त्या उलट अमेरिका म्हणजे काय वाटेल ते करण्याची मुभा असलेला देश. स्कँडिनेव्हिया, भूतान हे आनंदी लोकांचे देश. इथल्या सरकारने जणू लोकांच्या आनंदाची जबाबदारीच घेतली आहे. सिंगापूर त्याच्या सौंदर्यसृष्टीसाठी लक्षात राहतो. आपण घर सजवितो, या लोकांनी अख्खा देशच सजविला आहे.

मंडळी, केल्याने देशाटन, पंडित मौनी सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार! हे खरं आहे आणि आपण कितीही व्हर्च्युअल किंवा डिजिटल सहली केल्या तरी प्रत्यक्ष प्रवास केल्याची प्रगल्भता काही वेगळीच असते. तेव्हा चला, प्रवास करुया, माणसं वाचूया, देश समजूया, ज्ञान वाढवूया आणि सर्वार्थाने समृद्ध होऊया फक्त केसरीसोबत!

Tags