गेल्या आठवड्यात मालदीव्स प्रकरणामुळे नेहमी आमच्या सोबत फिरणाऱ्या एका पर्यटक कुटुंबाने मला थेट प्रश्न विचारला, “झेलमताई, खरंच लक्षद्वीप बेटं मालदीव्स इतकीच प्रसिद्ध पर्यटन स्थळे बनतील का हो? ते खरेच मालदीव्स सारखे आहे का?” मी म्हटलं, मालदीव्स हा देश आहे आणि लक्षद्वीप हा भारतातील सुंदर सागरकिनारा आणि जैवविविधता लाभलेला एक छोटासा केंद्रशासित भाग आहे. लक्षद्वीप ही तर आपली खरी राष्ट्रीय संपत्ती.
लक्षद्वीप हा ३६ एक्झॉटिक बेटांचा समूह आहे तर मालदीव्स हा ११९२ बेटांचा प्रचंड मोठा प्रदेश आहे. परंतु, लक्षद्वीप इतके सुंदर आहे की पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आणि निसर्गाला जपणारे नियम जर बनले तर तो मालदीव्सला नक्कीच एक अतिशय सुंदर पर्याय ठरेल. सुंदर क्रिस्टल क्लिअर समुद्रकिनारा, मालदीव्सपेक्षा चांगलं लँडिंग असलेला अगस्ति एअरपोर्ट लक्षद्वीपमध्ये आहे. लक्षद्वीपचे क्षेत्रफळ ३२ चौ. किमी इतके आहे. इथे १२ प्रवाळ बेटे, ३ रीफ आहेत आणि इथल्या १० बेटांवर लोक राहतात. ९० हजार चौ. किमी क्षेत्रफळात पसरलेल्या मालदीव्सकडे २९८ चौ. किमी भूभाग आहे. १६४ बेटांवर रिसॉर्ट उभे राहिले आहेत. लक्षद्वीपमध्ये जितक्या लवकर पायाभूत सुविधा उभ्या राहतील तितक्या लवकर भारतीय पर्यटकांना लक्षद्वीपची नयनरम्य बेटे मालदीव्सपेक्षा कमी खर्चात आणि कमी वेळेत पाहता येतील. मालदीव्स जास्त खर्चिक असून त्याच्या एक तृतीयांश खर्चात आपण लक्षद्वीप पाहू शकतो. इथल्या ५ स्टार रिसॉर्टचा खर्चही तुलनेत कमी आहे. आपल्या देशातील पायाभूत सुविधा जोमाने बदलत आहेत, तसा भारतातील हा गुप्त खजिना प्रकाशझोतात येत आहे. लक्षद्वीप त्या पैकीच एक असून पर्यटक आता मोठ्या संख्येने केसरीसोबत लक्षद्वीपला जाऊ लागले आहेत. लक्षद्वीपचा अर्थ लाखो बेटांचा समूह असा असला तरी लक्षद्वीपला भेट दिल्यावर लक्षलक्षसमाधान मात्र नक्कीच मिळते.

भारतातील ज्या ज्या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तिथे पर्यटन झपाट्याने वाढले. नुसतेच वाढले नाही तर पर्यटकांनी ती पर्यटनस्थळे डोक्यावर उचलून धरली. लेह लडाख, गुजरात, कारगील, चारधाम, वाराणसी (काशी) प्रमाणेच येत्या काळात अयोध्या, गंगा सर्किट आणि लक्षद्वीपचे पर्यटन जोमाने सुधारणार आहे. अतुल्य भारताच्या अमेझिंग डेस्टिनेशन्सला फक्त भारतीयच नाहीत तर परदेशी पर्यटकही आता मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.
लक्षद्वीप जसा भारतीयांसाठी नैसर्गिक सौंदर्य आणि प्रवाळ बेटांचा मानाचा तुरा आहे. अयोध्या हे भारतीय संस्कृतीशी आणि आध्यात्मासाठी अभिमान असलेला प्रदेश आहे. नुकत्याच २२ तारखेला झालेल्या ऐतिहासिक आणि संस्मरणीय सोहळ्यात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराचे सुरेख रेखीव काम पूर्ण झाल्यामुळे भारतीयांच्या अस्मितेला स्वाभिमानाचे कोंदण लाभले आहे. मंदिराचे नेत्रदिपक कव्हरेज जगभर प्रसिद्ध झाल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्याच नाही तर प्रत्येक पर्यटकांच्या मनात मंदिर पाहावे अशी इच्छा निर्माण झाली असणार हे नक्कीच. खास लोक आग्रहास्तव आपण अयोध्येच्या सहली सुरु केल्या आहेत. चलो अयोध्या राम मंदिर यही बनायेंगे चा प्रवास चलो अयोध्या राम मंदिर जरूर देखेंगे पर्यंत येऊन पोहचला आहे. तसं पाहिलं तर हा प्रवास खूप खडतर होता मात्र परंतु सरते शेवटी प्रभू श्रीराम आपल्या हृदयातून मंदिरात वसले आहेत. त्यामुळे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याची व आधुनिक अयोध्या नगरी पाहण्याची प्रत्येकालाच ओढ लागली आहे.

एक पर्यटनसंस्था म्हणून आम्हाला भारताच्या बदलत्या पायाभूत सुविधांचा आता प्रचंड अभिमान वाटतो. भारतासारखा इतका वैविध्यतेने नटलेला प्रदेश जगात कुठेही नाही, असे आम्ही अनेक वर्षे म्हणत होतो. आणि उत्तम पायाभूत सुविधा द्या, अशी विनंतीही करत होतो.
आता या पायाभूत सुविधा झपाट्याने बदलत आहेत, याचा प्रचंड आनंद आणि समाधान वाटते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपला भारत बदलतोय, चला आपणही बदलूया. बदलत्या भारताच्या विविध पर्यटन क्षेत्रांना भेट देऊया. आणि आपल्या अतुल्य भारताची अविस्मरणीय सहल करूया, फक्त केसरी सोबत!
चला आनंदाने पर्यटन जपुया आणि जगूया !!!
पर्यटकांसाठी महत्त्वाची टीप
सहलीला कुठेही जाताना प्रवासी विमा (इन्शुरन्स) फार महत्त्वाचा असतो. अनेकदा भारतात प्रवास करताना आपण अनावधानाने प्रवासी विमा काढायला दुर्लक्ष करतो. प्रवास कुठलाही असो, देशातला वा परदेशातला, आपला प्रवासी विमा वैध आहे की नाही हे जरूर तपासून पाहा. केसरीच्या सर्व सहलींना विमा संरक्षण आहे.