आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! आज नवरात्रीनिमित्ताने पुनःश्च आपल्या भेटीला येताना मनापासून आनंद होत आहे.
वर्षाऋतूची सांगता होत अश्विन मासाची चाहुल लागली. या आल्हाददायी वातावरणात नऊ रंगांची, स्फुर्तीची, तेजाची क्षितिजे पाठवणारा आदिशक्तीच्या आराधनेचा नवरात्रोत्सव सुरू झाला! घटस्थापना होऊन उत्साहात आदिशक्तीच्या जागराने नवरात्री सजल्या आहेत. तसं पाहिलं तर प्रत्येक सण प्रतीवर्षी आशेची नवी दालनं खुली करतो! नित्य नवा उत्साह आणि प्रकाश देणारा सूर्य कधी जुना होत नाही. त्याचप्रमाणे हे सण-उत्सव नाविन्याची झालर पांघरून नवचैतन्य घेऊन आपल्या भेटीला कायम येतात. खरं पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कुठलाही सण म्हंटलं की, त्याची गुंफण स्त्रीवर्गाभोवती असतेच. मुख्यतः नवरात्रोत्सवात ती प्रामुख्याने जाणवते!
अंतराळवीर कल्पना चावला, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अँप्युटी डॉ. अरूणिमा सिन्हा, नुकतंच पॅरालिंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या अवनी लेखरा, ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या मनू भाकर…. अशी एक ना अनेक नावं कानावर पडली तर स्त्रीशक्तीचा जागर वर्षाचे बाराही महिने सुरू असतो असं आवर्जून वाटतं. या जागराचा प्रारंभ वेदांत आणि इतिहासात झाल्याचं प्रामुख्याने दिसून येतं. स्त्रीशिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, महिलांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी स्त्री समृद्धतेची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासह परराज्यातील महिलांचं संरक्षण, आदर आणि सन्मान करण्याची शिकवण दिली. ज्यातून त्यांची उच्च नैतिकता दिसून येते. आजच्या आधुनिक युगातही स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न होतात, परंतु त्यांना म्हणावं तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. हे पाहता एक गोष्ट आवर्जून वाटते ती म्हणजे, प्रत्येक स्त्रीने स्वत:तील आदिशक्ती जागवणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्या स्त्रीला आदर, सन्मान देणं, तिचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तरच तो खऱ्या अर्थाने प्रत्येक स्त्रीचा आणि आपल्या भारतमातेचा सन्मान ठरेल!
पुरातन काळापासून स्त्रीशक्तीची उपासना, तिची महती विविध स्तरांवर जोपासली जात आहे. देशात चहूबाजूंना विस्तारलेली ५१ शक्तिपीठं, आदिशक्तीची मंदिरं यांच्या माध्यमातून याचं प्रतिबिंब दिसून येतं. तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणादायी जीवनचरित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. जम्मू-काश्मीरच्या कटरा येथील पांडवकालीन वैष्णोदेवीचं मंदिर, तामिळनाडूतील सुंदर द्रविड स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मिनाक्षी मंदिर किंवा हिमाचल प्रदेशमधील ज्वाला देवी मंदिर… जिथे कोणतीही देवी नसून नैसर्गिकरित्या सतत तेवत असणाऱ्या ज्योतीची पूजा केली जाते. या प्रत्येक दैवी धार्मिक अधिष्ठानांची भेट ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या महती सांगते. नवरात्रीदरम्यान तर या प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच उर्जा, उत्सव आणि मांगल्य जाणवत असल्याचं श्रद्धाळूंचा अनुभव सांगतो.
आदिमातेची ही महती आणि अनमोल शिकवण भाविकांपर्यंत पोहचवणाऱ्या या धार्मिक अधिष्ठानांचा समावेश केसरीचं आध्यात्मिक दालन म्हणजेच मारीगोल्डच्या मंगलमय यात्रांमध्ये केला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर नरसोबाची वाडी यात्रेतील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, तर महाराष्ट्र ज्योतिर्लिंग शिर्डी यात्रेत ज्योतिर्लिंगांसह कुलस्वामिनी योगेश्वरी देवीचं दर्शन घडतं. उत्तर प्रदेशातील श्रीकृष्ण चरित्र यात्रेतील श्रीकृष्णाच्या प्रमुख ठिकाणांना भेट देतानाच भद्रकाली मंदिर, कात्यायनी मंदिर, रूक्मिणी मंदिरांना भेट देत देवींचं दर्शन घेतो. पारंपरिक चारधाम यात्रेत प्राचीन मिनाक्षी मंदिर, साऊथ इंडिया टेंपल टूरमध्ये पद्मावती मंदिर, कांचीकामाक्षी मंदिर तर मदुराई रामेश्वरम् कन्याकुमारी यात्रेतील मिनाक्षी मंदिर, कन्याकुमारी मंदिर, अमृतसर वैष्णोदेवी यात्रेतील वैष्णोदेवी शक्तीपीठ, उत्तराखंडमधील कैलास मानसरोवर यात्रेत मनसा शक्तीपीठाचं दर्शन घडतं, त्रिस्थल दर्शन अयोध्या यात्रेतील विश्वलाक्षी मंदिर, जगन्नाथ पुरी कोलकाता गंगासागर यात्रेतील कालीघाटी काली मंदिर, सौराष्ट्र स्टॅच्यू ऑफ युनिटी यात्रेत रूक्मिणी मंदिर, आंध्र प्रदेशमधील पिठापुरम कुरवपूर श्रीशैलम यात्रेतील कनक दुर्गा मंदिर, भ्रामरंभा देवी मंदिर तर डिव्हाईन नेपाळ मुक्तीनाथ यात्रेतील मनकामना मंदिर, मायादेवी मंदिर या आदिशक्तींचं दर्शन घडतं. या सोबतच यात्रांमध्ये इतर महत्त्वाची धार्मिक अधिष्ठानं, नैसर्गिक आणि प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देतो.
मंडळी, या आदिशक्तींचं स्वरूप विराट आहे. या महारूपी नारायणीच्या आगमनाने सर्वांना सौख्य, समृद्धी, आनंद प्राप्त होऊदे. आपली सेवा तिच्या चरणी रुजू होऊन या सर्व आदिशक्तींचा आशीर्वाद आपल्या सर्वांस लाभो हीच मनोभावे प्रार्थना आणि येणाऱ्या विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!