मंडळी, नमस्कार! लहानपणी ज्यांचा हात हातात धरून स्वप्न पाहिली, ते आमचे भाऊ आता सोबत नाहीत. त्यांच्या निधनानंतर असंख्य सांत्वनपर संदेश, पत्रं, आठवणी, किस्से पाठवून आपण आमचं दुःख कमी केलंत. शतशः धन्यवाद!
भाऊ नाहीत, हे स्वीकारणं कठीण आहे. पण केसरी टूर्सच्या माध्यमातून त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे, हीच आमची त्यांना विनम्र श्रद्धांजली !
लहानपणी फक्त डिस्नेलँड पाहण्याचं स्वप्न पाहणारी मी, पुढे हळूहळू मोठी स्वप्नं पाहू लागले. सिलसिला सिनेमा पाहून आल्यावर ट्युलिप्स गार्डन पाहण्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करण्याची खूणगाठ मी मनाशी बांधली. पण प्रवास हा सुद्धा एक नशाच जणू, पायाला भिंगरी लागावी तशी मी सप्तखंडात प्रवास करण्याची स्वप्नं पाहू लागले. जगातील सहा खंड बघून झाले आणि माझ्या या बकेट लिस्टवरचा शेवटचा खंड म्हणजे अंटार्क्टिका. गेली 10-15 वर्षे हे स्वप्न मनात होतं, आणि आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अंटार्क्टिकाला निघालो.

अंटार्क्टिकाच्या वाटेवर जगाचं शेवटचं गाव म्हणून ओळखलं जाणारं अर्जेंटिना मधलं उशुवाया गाव आम्ही गाठलं. खरं तर भारतीयांना मजल दरमजल जवळजवळ 30-32 तासांचा प्रवास करावा लागतो. सोबत असलेल्या प्रवाशांचंही सप्तखंड पादाक्रांत करण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे पहाटे 3 वाजता उठून सकाळी 7 वाजता बुएनोस आयरेसहून फ्लाइट घेतली. वाटलं की इतका मोठा प्रवास केल्यावर लोक आराम करतील. तरी सगळ्यांचे चेहरे टवटवीत होते. बहुतेक प्रवासाच्या उत्साहाने ! टूरवर असताना लोक लहान मुलांसारखे बागडत असतात, हा माझा अनुभव आहे. असो. आम्ही आता उशुवाया पोहोचलो आणि क्रूझने पुढचा प्रवास सुरू केला.
आमची ही क्रूझ काही महाकाय लक्झरी क्रूझ मुळीच नव्हती आणि म्हणूनच ती मला अधिक आवडली. फक्त 200 पर्यटक आणि 70-80 क्रू मेम्बर्स असलेली ही एक्सपीडीशन क्रूझ छोटी पण सुंदर आणि कोझी वाटली. आमच्या सर्व केबिन्स बाल्कनी केबिन्स होत्या, त्यामुळे संपूर्ण ग्रुप आनंदी होता.
आमच्यासोबत 75 वर्षांचे रानडे काका काकू होते. प्रवास कसा होईल, याची त्यांना शंका वाटत होती. तसंच ड्रेक पॅसेज किती भयंकर असतो याबाबत ऐकून मनात थोडी भीती होती. आम्ही बीगल चॅनल मार्गे प्रवास करत होतो. हजारो वर्षांपूर्वी अंटार्क्टिका हा साऊथ अमेरीकेचाच भाग होता. पण ड्रेक पॅसेजमुळे तो वेगळा झाला. साऊथ अमेरिकेचं केप हॉर्न आणि साऊथ शेटलँड आयलँड ऑफ अंटार्क्टिका यामधला जलभाग म्हणजे ड्रेक पॅसेज हा जलमार्ग नेहमीच रौद्र रूप धारण करून असतो. मात्र जाताना आम्हाला तो एक मस्त एडव्हेंचर वाटला. ड्रेक पॅसेज पार केल्यावर समोर आलेला नजारा जस्ट माईंड ब्लोइंग होता कारण आम्ही अंटार्क्टिकाला पोहचलो होतो! जगातील सर्वात कोरडा, ओला आणि पांढरा शुभ्र भाग म्हणजे अंटार्क्टिका ! चारही बाजूंना फक्त बर्फाचं साम्राज्य.

सूर्यप्रकाशाचं झळाळणं आणि तीव्र थंडी ! नशीबाने आम्हाला हवामान खूप छान मिळालं पाऊस नाही, फक्त हवेतला गारवा आणि हवा तेव्हडा सूर्यप्रकाश. आमच्या क्रूझवर 16 छोट्या झोडियॅक बोटी होत्या. त्यात बसून आम्ही पुढील तीन दिवस अंटार्क्टिकाचा प्रदेश एक्स्प्लोर करणार होतो. क्रूझवर तर आपण सर्व प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतोच. सोबत या छोटेखानी झोडीयॅक बोटींतून प्रवास कसा करायचा याचं उत्तम प्रशिक्षण देण्यात आलं.
या झोडियॅक बोटीत बसून मारलेला अंटार्क्टिकाच्या बर्फमय प्रदेशाचा फेरफटका म्हणजे खरंच एक अविस्मरणीय अनुभव. या प्रवासात आम्ही विविध प्रजातीच्या पेंग्विन्सच्या वसाहती पाहिल्या. महाकाय बर्फाचा कडा तुटताना पाहिला. आमच्या बोटीच्या बाजूने व्हेल्स आणि पेंग्विन्स पोहताना दिसले. वेडेल सील, फर सील, लेपर्ड सील आणि वेगवेगळ्या प्रजातींचे सील सुद्धा पाहता आले. अल्बट्रोज, पेट्र्ल्स, स्कुआ, अंटार्क्टिक टर्न, विलसन्स स्टॉर्म टर्न, आर्क्टिक टर्न, हे सारे पक्षी बघितले.
पेंग्विन्सची लाइफस्टाईल म्हणजे खूप मज्जाच त्यांचं दुइदुइ चालणं, पाण्यात डुबकी मारणं, त्यांची भांडणं, हे सगळं बघताना खूपच आनंद वाटला. काही पेंग्विन्स तर जणू आमचं स्वागतच करत होते. आमच्या बोटींसोबत त्यांच्या छोट्या थव्यांनी पोहण्याचा मोह सोडला नाही! आणि आम्ही त्यांना कॅमेऱ्यात टिपत होतो. खूपच छान नजारा होता.

आजचा दिवस खास होता कारण आज आम्ही कॉन्टिनेन्टल लँडिंग म्हणजे पेंग्विन्सच्या विश्वात, त्यांच्या कॉलनीत प्रत्यक्ष उतरणार होतो आणि बर्फात हाईक करणार होतो. हे अनुभव प्रत्यक्ष जगणं म्हणजे केवळ अद्भुत ! ग्लेशिअर पाहिला! पांढरा, निळा, काळा आणि क्लिस्टल क्लिअर असे बर्फाचे वेगवेगळे प्रकार पाहिले.
Neko आयलँडवर गेलो. तसंच Le Maire Channel या अतिशय निसर्गसुंदर बर्फाच्या स्ट्रेटमधून आम्ही प्रवास केला. हा एक अंटार्क्टिकाचाच भाग. बर्फाच्या दरम्यान असलेल्या 600 मीटर रुंद आणि 11 किमी लांब स्ट्रेटमधून जाणं म्हणजे जणू निसर्गात विरघळण्यासारखं होतं आणि या ठिकाणांतील सौंदर्य अवर्णनीय होतं. कोडॅक गॅप म्हणूनही ओळखला जाणारा हा भाग म्हणजे चारही बाजूला बर्फाचं राज्य डोंगर, ग्लेशियर्स, आईसबर्ग आणि त्यातून इवल्याशा बोटी घेऊन जाणारे आम्ही. या भागातून प्रवास करणं, इथला सुंदर नजारा पाहणं म्हणजे एक स्वप्नवत अनुभव आज आम्ही पोलर प्लन्ज म्हणजेच बर्फाच्या पाण्यात उड्या मारण्याचा अनुभव घेतला. या मानवरहित बेटावर बर्फाचं साम्राज्य असलं तरी व्हेल्स, पेंग्विन्स, सील्स आणि विविध पक्ष्यांचीच इथे सत्ता असते.

अंटार्क्टिका कोणतीही कायमस्वरूपी लोकवस्ती नाही. अंटार्क्टिका तहानुसार 29 देशांची संशोधन केंद्रे येथे कार्यरत आहेत. अमेरिका, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, बेल्जीयम अशा विविध देशांतील संशोधक येथे अभ्यासासाठी येतात. उन्हाळ्यात साधारणतः 5000, तर हिव्हाळ्यात फार फार 1000 लोक येथे राहतात. इतकीच काय ती इथली मनुष्यवस्ती. परंतु इथे 11 मुलांचा जन्म झाल्याची नोंद आहे.
झोडियॅक बोटीतून शेवटच्या प्रवासात, आम्ही बर्फाच्या असंख्य छोट्या फुलांसारखे आईसबर्न्स सभोवतालच्या पाण्यात तरंगताना पाहिले. जणू संपूर्ण समुद्र बर्फाच्या फुलांनी बहरला होता. आम्ही इथे खूप फोटोज काढले. अशा आगळ्यावेगळ्या, थोड्याश्या थरारक, साहसी आणि विस्मयकारक प्रवासाला जायचं, तर जगातला हा सातवा खंड, अंटार्क्टिका बघणं मस्ट. त्याशिवाय सप्तखंडाची टूर पूर्ण कशी होणार?
आणि हो, आम्ही आहोतच तुमची काळजी घ्यायला ! तेव्हा सज्ज व्हा, पांढऱ्या शुभ्र खंडाच्या या अनोख्या प्रवासासाठी! चला अंटार्क्टिकाला फक्त केसरीसोबत !