साऊथ अमेरिका फक्त केसरीसोबत!

मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांसह अनेक अमेझिंग साईटसिईंग्सनी बहरलेली परिपूर्ण सहल.

“झेलम ताई, जगातील अविस्मरणीय किंवा अनोख्या पर्यटनस्थळांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का?”, रोटरी क्लबच्या एका कार्यक्रमात मला हा प्रश्न विचारण्यात आला. मला तर सगळीच पर्यटनस्थळं अनोखी वाटतात, त्यामुळे काय सांगू हा विचार करत होते. मग अभ्यास करून जगातील २५ पर्यटनस्थळं शोधली जिथे आपण नक्कीच जायला हवं.

बोलिव्हियातील सालार दे उयूनी हे या अनोख्या पर्यटनस्थळांपैकी एक. दहा हजार चौ. किमी परिसरात पसरलेलं हे जगातील सर्वात मोठे मिठाचं मैदान पावसाळ्यात त्याच्या आरशासारख्या परावर्तनासाठी तर उन्हाळ्यात विशाल पसरलेल्या पांढर्‍या लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला भेट दिली आणि मग अशा अनोख्या ठिकाणांना शोधण्याचा मला छंदच लागला. याच शोधात गेल्या वर्षी मी साऊथ अमेरिकेचा प्रवास केला. फारश्या मॉडर्न नसलेल्या आणि प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या खंडातील देशांना देवाने नैसर्गिक साधनसंपत्तीने सम्पन्न केलं आहे, हे प्रकर्षाने जाणवलं. 

नकाशात पाहिलं तर बरेचदा साऊथ अमेरिका हा अमेरिकेचाच भाग वाटतो, परंतु हा अगदी वेगळा खंड. पृथ्वीचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं जगातील सर्वात मोठं उष्णकटिबंधीय जंगल म्हणजे अमेझॉनचं जंगल हे इथेच आहे. या अमेझॉन जंगलाची भेट हा साऊथ अमेरिका सहलीमधील सर्वात हायलाईट पॉईंट. वळणदार नद्या, दुर्मीळ प्रजातीचं वन्यजीवन आणि हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घेत केलेली अमेझॉन क्रूझची सफर हा प्रत्येक वेळी एक अविस्मरणीय अनुभवच ठरतो. इग्वासू वॉटरफॉल्स हा महाकाय धबधबाही आपण या सहलीत पाहतो. तसंच जगातील सात आश्चर्य पाहण्याचं स्वप्न असणाऱ्या मंडळींना या सहलीत ख्राईस्ट दि रिडीमर आणि माचू पिचू ही दोन जागतिक आश्चर्ये पाहता येतात.

इंका वंशाच्या लोकांनी १४व्या शतकात उंच डोंगरावर माचू पिचू कसं बांधलं असेल याचं कोडं आजतागायत सुटलं नाही. ख्राईस्ट दि रिडीमर हा येशूचा पुतळा जणू आकाशाला गवसणी घालतो आणि साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश देतो असं वाटतं. दोन्ही मानवनिर्मित आश्चर्यांच्या निर्मात्यांना खरोखर सलाम! 

माचू पिचूची कथा अतिशय मनोरंजक. Pachacútec हे पेरूतील इंका साम्राज्याचे शासक. कुसको व्हॅली पार करून त्यांनी chanca ना हरवलं आणि डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या उंच डोंगर माथ्यावर सुरक्षित ठिकाणी माचू पिचू वसवलं. इंकाच्या पुढच्या तीन पिढ्या येथे राहिल्या. पुढे हे शहर काळाच्या पडद्याआड गेलं, उरुबांबा कॅनयन मधील सुंदर निसर्गाचाच एक भाग झालं आणि सुमारे चारशे वर्षांनी वास्तुशास्त्राचा हा अप्रतिम नमुना जगासमोर आला. प्रोफेसर Hiram Bingham  यांनी हा खजिना जगासमोर आणला आणि आज हे ठिकाण जगातील सात आश्चर्यांचा भाग झालं आहे. जगभरातील सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करणारं हे ठिकाण आता आपण साऊथ अमेरिकेच्या या सहलीत पाहू शकतो. मऊ, उबदार आणि उच्च दर्जाच्या लोकरीसाठी प्रसिद्ध असलेला अल्पाका हा पाळीव प्राणी आपल्याला या सहलीत पेरूमध्ये पाहता येतो.

९८ फूट उंच ९२ फूट रुंद ख्राईस्ट दि रिडीमर हा भव्य पुतळा जगातील सगळ्यात मोठं आर्ट डेको स्टाईल स्कल्पचर आहे. जगभरातील ख्रिस्ती धर्माचे प्रतीक असलेलं हे स्मारक रिओ दि जानेरो आणि ब्राझीलचे सांस्कृतिक चिन्ह देखील आहे. हे भव्य शिल्प कोरकोवाडो पर्वताच्या शिखरावर स्थित आहे, जेथून आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य पाहता येतं. पसरलेल्या हातांची मुद्रा शांततेचं प्रतीक असून जगभरातील लोकांचं स्वागत करतं. 1922 ते 1931 या काळात हे शिल्प बांधण्यात आलं असून, आज ते जगातील नव्या सात आश्चर्यांपैकी एक मानलं जातं.

रिओ कार्निव्हल हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि रंगीत उत्सव. आकर्षक वेशभूषा, उत्साही साम्बा संगीत, आणि नेत्रदीपक सजवलेल्या फ्लोट्ससह रिओ दे जानेरो शहर संपूर्णपणे एका भव्य उत्सवामध्ये परिवर्तित होतं. जणू एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभवच. जगातील सर्वात मोठ्ठा कार्निव्हल पाहता यावा म्हणून आपली ही सहल दर वर्षी मुद्दाम रिओ कार्निव्हलच्या वेळी असते. 

पेरीतो मोरेनो ग्लेशियर आणि माचू पिचू यांचा शोध तर विसाव्या शतकात लागला, वेळेनुसार अजूनही नवी आणि आश्चर्यकारक ठिकाणं प्रकाशझोतात येतील, हे तितकंच खरं. तरी २० दिवस १९ रात्रीच्या या सहलीत आपण साऊथ अमेरिकेतील ४ नयनरम्य देशांना आणि १० मोठ्या शहरांना भेट देतो. माचू पिचूचं रहस्य, ॲमेझॉनचं नैसर्गिक सौंदर्य, ख्राईस्ट दि रिडीमरची भव्यता आणि रिओ कार्निव्हलची धम्माल पाहून साऊथ अमेरिका पाहायला गेलेला प्रत्येक पर्यटक चकित होतो. पेरूमधील लिमा आणि कुज्को ही ठिकाणंही आश्चर्यकारक आहेत. त्यामुळे या सहलीत भरपूर विमानप्रवास असला तरी या जगावेगळ्या ठिकाणांना पर्यटक मोठ्या उत्साहाने भेट देतात. या सोबतच शुगरलोफ माउंटन केबल कार राईड, ब्यूनस आयर्समधील भव्य तांगा शो, आदी एकापेक्षा एक भन्नाट गोष्टी समाविष्ट असलेली साऊथ अमेरिका विथ रिओ कार्निव्हल ही केवळ एक सहल नसून अनेक आश्चर्ये आणि जगातील सर्वात जुन्या शहरीकरणाच्या ठिकाणांना दिलेली भेट आहे. देश वेगळे, लोक वेगळे परंतु एकच खंड आणि आपल्यासाठी उत्तमोत्तम आठवणींचा नजराणा घेऊन आलेली या खंडाची, रिओ कार्निव्हलसह साऊथ अमेरिकेची सहल २७ फेब्रुवारीला निघत आहे. उत्तम सुविधांसह सर्वोत्तम हॉटेल्स, बेस्ट एअरलाईन्स, केसरीचं अनुभवी आपलं माणूस आणि पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी बरंच काही आहे. तर चला जगूया, जग पाहूया फक्त केसरीसोबत!

Tags