Gratitude

“झेलम, त्या बाई सद्गतीत झाल्या, त्यांना रडू आलं आणि त्यांनी मला एक लेटर हातात दिलं” माधव दाबके सरांनी हा प्रसंग सांगितला. मात्र ऐकणाऱ्या आम्हालाही हे सारं ऐकताना दुःख, आश्चर्य आनंद अशा मिश्र भावना मनात दाटून आल्या आणि भारतीयांच्या नावीन्यतेबद्दल अभिमान वाटला. झालं असं की, आम्ही काही व्यावसायिक जगभरातील प्रसंग, माणसे आणि अनुभव यावर चर्चा करत होतो, तेव्हा दाबके सरांनी सांगितलेला हा किस्सा खूपच मनावर कोरला गेला. ही आहे गोष्ट स्लोव्हेनिया या देशातील दाबके सर आपलं काम संपवून घरी निघाले होते, तेव्हा त्यांच्या तिथल्या असोसिएटने त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं. त्यांनी नम्रपणे ते नाकारलं; मात्र ते गृहस्थ म्हणाले, ” माझ्या आईला तुम्हाला भेटायचं आहे.” आता आईचं आमंत्रण कोण नाकारेल, नाही का? सरांना थोडं आश्चर्य वाटलं, पण ते त्यांच्या घरी जेवायला गेले. जेवण आणि गप्पा झाल्यानंतर त्यांच्या आईने तिची गोष्ट सांगितली. लहानपणी तिचं अपहरण झालं होतं. तिच्या आई-वडिलांकडे खंडणी भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे तिच्या पायाला इजा करून तिला तिथेच सोडून देण्यात आलं. कालांतराने ती या आघातातून बाहेर आली आणि हळूहळू कृत्रिम पायांच्या मदतीने ती पुन्हा उभी राहू शकली आणि ते शक्य झालं केवळ जयपूर फूटमुळे तिला जयपूर फूटपर्यंत कसं पोचावं आणि कोणामार्फत पोचावं हे समजत नव्हतं. (हा इंटरनेटपूर्व काळ होता) म्हणून, जेव्हा एक भारतीय आपल्या मुलाच्या कंपनीत आला आहेहे समजलं तेव्हा त्याला घरी बोलावून जयपूर फूटला द्यायचं हे कृतज्ञता व्यक्त करणारं लेटर दिलं. ही गोष्ट मनाला चटका लावून जाणारी आहे; पण तितकीच ती अभिमानास्पदही. कारण, एका भारतीय उपक्रमाने जगाच्या कोपन्यात एका महिलेला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली होती आणि आयुष्य सुकर झालं होतं.

इथे मला माननीय आनंद महिंद्रा सरांचा एक व्हिडिओ आठवतो. मुलीच्या उपचारासाठी ते अमेरिकेला गेले असता, तिथल्या डॉक्टरांनी एका भारतीय डॉक्टरांचं नाव त्यांना सुचवलं; आणि भारतात आल्यावर त्या डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी उपचार केले आणि ती बरी झाली. अशा गोष्टी वाचल्या किंवा ऐकल्या की देशाप्रेमाची भावना अधिक जागृत होते. 

सेवा परमोधर्म हीच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. समाजासाठी, गरजूंकरिता आणि मानवतेसाठी केलेली सेवा हाच आपल्या संस्कृतीचा पाया आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे – कोणाला, कधी, कुठे, कुणामुळे, कशी मदत मिळेल किंवा आनंद मिळेल, हे कधीच सांगता येत नाही. चांगुलपणा हा संसर्गासारखा असतो तो पसरतच राहतो. आम्ही जगभर प्रवास करताना असे अनेक अकल्पित प्रसंग अनुभवतो; परंतु प्रत्येक वेळी कोण ना कोण देवदूत मदतीला धावून येतो. कधी एखादी एअरलाईन देवदूत ठरते, तर कधी कॉन्सुलेट कधी तिथली स्थानिक माणसं धावून येतात. त्यांच्या मदतीमुळे आपण त्या प्रसंगांतून नेहमीच सुखरूप बाहेर पडतो आणि विसरूनही जातो, म्हणूनच न विसरता या सगळ्यांप्रती सजगता आणि कृतज्ञता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्या माऊलीनं आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा जपली आणि एका भारतीयाच्या माध्यमातून ती पूर्ण केली हेच दाखवून देतं की खरी कृतज्ञता कधीही विसरली जात नाही.

जयपूर फूट प्रमाणेच अरविंद आय केअर सिस्टिम, नारायण हेल्थ, तसेच द अक्षय पात्र फाऊंडेशन, सुलभ इंटरनॅशनल आणि हेल्पएज इंडिया सारख्या अनेक संस्थांनी हे सिद्ध केलंय आहे की आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या साहाय्याने अत्यंत कमी खर्चात जगभरातील लोकांचं आयुष्य बदलता येते.

आपल्या वसुधैव कुटुंबकम् या संस्कृतीतूनच सेवा हा संस्कार आपल्याला मिळतो आणि अशाच विचारांतून संशोधन घडतं व नवे मार्ग निर्माण होतात. आगामी काळात भारताने अशाच प्रकारे कमी खर्चात उत्कृष्ट उपाय जगाला देत राहावेत; भारतीय संस्कृती, भारतीय संशोधन आणि भारतीय व्यापार यासाठी जगभरातील लोक भारतात मोठ्या संख्येने पुन्हा येवो आणि भारतीय पर्यटनाचे अच्छे दिन येवो.

काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात? हे इथे आल्यावर कळलं. काश्मीर प्रत्यक्षात स्वर्गाहून सुंदर आहे. इथलं निसर्गसौंदर्य, स्थानिकांचं आदरातिथ्य आणि प्रेक्षणीय स्थळ.. सारं काही सुंदर! या टूरमध्ये दोन गोष्टी आमच्यासाठी सरप्राईज ठरल्या. पहिली म्हणजे गुलमर्गमध्ये अचानक झालेला स्नोफॉल आणि दुसरी म्हणजे ट्युलिप्स गार्डन्स आम्ही विचारही केला नव्हता, की हे अनुभवता येईल. गंडोला राईड खूपच आवडली. अरु व्हॅली तर मस्तच ! टूर लीडर महेशने आम्हा सर्वांची काळजी घेतली. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली. अंतर्गत बस प्रवास सोयीस्कर आणि हॉटेल्सही दर्जेदार केसरीचं व्यवस्थापनही उत्तम. या परिपूर्ण अनुभवामुळे आमची टूर अविस्मरणीय ठरली!

– शुभांगी म्हात्रे, डिलाईटफुल काश्मीर

Tags