ऐतिहासिक सौंदर्याचा वारसा ! – सेंट्रल युरोप भाग दोन

मंडळी, सेंट्रल युरोप आर्टीकलच्या पहिल्या भागात आपण पोलँड, जर्मनी, झेक रिपब्लिक, बर्लीन, ड्रेस्डेन आणि प्रागमधील इतिहास, निसर्गसौंदर्य आणि आकर्षणांबद्दल जाणून घेतलं. आज इथल्या इतरही अद्भूत स्थळांबद्दल जाणून घेऊयात. 

प्रागवरून एका वेगळ्या टाऊनला आपण भेट देतो… ते म्हणजे कुटना होरा, जिथे अनोखं बोन चर्च पाहतो. या चर्चमध्ये हजारो मानवी कवटी आणि हाडांपासून बनवलेल्या कलाकृती आहेत. आपल्या मंडळींना काहीतरी आगळंवेगळं आणि ऐकावं ते नवलंच असं साईटसिईंग पहायला मिळालं. १४व्या शतकातील ब्लॅक डेथ आणि १५व्या शतकातील हुसाइट युद्धांदरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाला. साधारण ४० ते ७० हजार लोकांचे मृतदेह स्मशानभूमीत पुरले. १६ व्या शतकापर्यंत या स्मशानभूमीत खूप मृतदेह झाले. त्यामुळे काही हाडं उकरून चॅपलमध्ये साठवली. त्यावेळी याचं व्यवस्थापन श्वार्सेनबर्ग कुटुंबाकडे होतं ज्यांनी त्याचं संरक्षण आणि नूतनीकरण केलं. साधारण १८७० साली श्वार्सेनबर्ग कुटुंबाने फ्रांटिक रिंट नावाच्या कलाकाराला ही हार्ड कलात्मकरित्या मांडायला सांगितली. त्याने ही हाडं आणि कवटी वापरून चर्चमध्ये कलाकृती तयार केल्या. हे पहायला पर्यटकही येऊ लागले आणि पाहता पाहता हे चर्च इथलं मुख्य आकर्षण बनलं. 

कुटना होरावरून पुढे आपण ऑस्ट्रीया देशातील व्हिएन्ना शहराला भेट देतो. व्हिएन्नामध्ये पुन्हा आपल्याला राजेशाही वैभव पहायला मिळतं. शॉनब्रून पॅलेस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेला हा पॅलेस उत्कृष्टरित्या जतन केल्यामुळे आजही इतिहास जिवंत करतो. इथल्या इमारती, पार्लिमेंट आणि पॅलेस हे सगळं गतकाळातील श्रीमंतीची साक्ष देतात… असा सगळाच रईसी थाट इथे होता. याचसोबत व्हिएन्नामध्ये आपण इतर अनेक ऐतिहासिक स्थळं आणि इमारती इथे पाहतो, पार्लिमेंट बिल्डींग, सिटी हॉल, हॉफबर्ग पॅलेस आणि हेल्डेनप्लात्ससह अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. तिथून पुढे आपण स्लोव्हेनियाची राजधानी ल्युब्लियाना या सुंदर शहराला जातो. २०१६ साली या शहराला युरोपियन ग्रीन कॅपिटल असा मान मिळाला. इथे आपण शहराची वॉकिंग टूर करतो. नंतर ब्लेड लेक पहायला जातो. टक्वॉइज ब्लू रंगाचं पाणी असलेला हा लेक शहराच्या मधोमध असून हा टूरमधील निसर्गसौंदर्याने नटलेला एक दागिनाच आहे, असं मी म्हणेन. इथला ब्लेड कॅसल आणि लेक पाहून फोटो काढण्याचा मोह आवरत  नाही ! ल्युब्लियानावरून युरोपमधील सर्वात मोठ्या पोस्तोंजा केव्हज्ना भेट देतो. एकूण १८ एकरपैकी ६ एकरवर पसरलेली ही केव्हज् आपण वॉकिंग टूरने पाहतो, ही नैसर्गिक केव्हज् अंडरग्राऊंड पाहताना निसर्गाच्या अद्भूत किमयेचा प्रत्यय येतो. ब्लेड कॅसल आणि पोस्तोंजा केव्हज्च्या भेटीमुळे हा दिवस अविस्मरणीय ठरतो. 

हे सारं पाहून क्रोएशिया देशातील झदार गावी पोहचतो. झदार हे डॅलमेशन कोस्टवरचं सुंदर गाव आहे. इथला सूर्यास्त आणि सी ऑर्गन इनोव्हेशन थक्क करणारं आहे! दुसऱ्या महायुद्धात नष्ट झालेलं झदार पुन्हा उभं राहिलं आणि प्लिटव्हीक नॅशनल पार्कस् प्रसिद्ध झाल्यामुळे झदारचं वैभव अजूनच वाढलं. झदारमध्ये आपण दुसऱ्या दिवशी सुंदर अशा प्लिटव्हीक नॅशनल पार्कला भेट देतो. इथल्या पाण्याचा टरक्वॉइज ब्लू रंग आणि धबधबे डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत पहावेसे वाटतात. पुढे क्रोएशियाची राजधानी झाग्रेबला पोहचतो. झाग्रेबचा इतिहास जाणून घेऊन पुढे हंगेरीची राजधानी बुडापेस्टला आलो, जे डॅन्यूब नदीमुळे विभागले आहे. १८७३ मध्ये ओबुडा, बुडा आणि पेस्ट अशी तीन शहरं एकत्र होऊन बुडा – पेस्ट झाले. ऑस्ट्रो हंगेरिअन एम्पायरमध्ये व्हिएन्नानंतर बुडापेस्ट मुख्य शहर ठरलं. बुडापेस्टमधील सुंदर साईटसिइंग्स्नंतर हम दिल दे चुके सनम या सिनेमाचं शूटिंग झालेला लिबर्टी ब्रिज पाहून आपली टूर संपते. 

मंडळी, ही टूर फक्त साईटसिईंग्स्ची टूर नाही, तर हजारो वर्षांच्या इतिहासाचा उहापोह या शहरांमध्ये होतो. फ्रेडरिक, जॉन, १४वे ल्युई, मेरिसा स्ट्रासे यांसारखे राजे, नेपोलिअन आणि हिटलरचा काळ या सर्वांची उत्तम तोंडओळख या टूरध्ये झाली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांमुळे ही शहरेच्या शहरे कशी उध्वस्त झाली होती आणि आजही ही शहरं इतिहासाची कशी उत्तमपणे जपणूक करत आहेत हे पहायलाच हवं! इथले पॅलेस, नद्या, तलाव, इमारतींची उत्कृष्ट स्थापत्यशैली आणि क्रूझचा प्रवास… प्रत्येक जागा वेगळं काहीतरी सांगते. असा वैविध्यपूर्ण सेंट्रल युरोप पहायला आपणही चला! दर्जेदार हॉटेल्स, बेस्ट एअरलाईन्स, व्हिसा मार्गदर्शन, लोकल क्युझिनसह स्वादिष्ट भारतीय भोजन, जे जे पहावं ते सर्व काही समाविष्ट…. अगदी टिप्स आणि सिटी टॅक्ससुद्धा, सोबतीला केसरीचं आपलं माणूस अर्थात एक्स्पर्ट टूर लीडर्सही आहेत, जे युरोप समजावतात. म्हणूनच पर्यटकांसाठी ही टूर म्हणजे खरोखरंच एक अविस्मरणीय अनुभव !

Tags